नागपूर : बलात्काराबाबत डॉक्टरांनी नोंदवलेले मत अंतिम सत्य असू शकत नाही. संबंधित परिस्थिती आणि त्याला सहाय्यक पुरावे हेच महत्त्वपूर्ण असतात, असे मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीन वर्षीय बालिकेसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीची शिक्षा कायम ठेवली. न्या. रजनीश व्यास यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

बुलढाणा येथील संग्रामपूर येथील ३६ वर्षीय दत्ता दिगंबर इंगळे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी पिडीत बालिकेच्या शेजारी राहत होता.  २१ नोव्हेंबर २००८ रोजी दुपारी तीन वाजता हा धक्कादायक प्रकार घडला. पीडित बालिका घराच्या अंगणात खेळत असताना शेजारी राहणाऱ्या आरोपीने तिला फसवून घरी नेले. काही वेळातच बालिकेच्या रडण्याचा आवाज आल्याने आजीने लक्ष दिले. बालिकेच्या पायांवर रक्त दिसले आणि विचारल्यावर बालिकेने आरोपीचे नाव सांगितले. तिच्या गुप्तांगातून रक्तस्राव होत असल्याचे आजीला दिसले. याबाबत तातडीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत गुदद्वारावर दोन जखमा आढळल्या. पीडितेच्या अंतर्वस्त्रांवर रक्ताचे डाग असून ते तिच्याच रक्तगटाचे असल्याचे फॉरेन्सिक तपासात निष्पन्न झाले. आजीची साक्ष, वैद्यकीय अहवाल आणि घटनास्थळी आढळलेले पुरावे यामुळे गुन्हा सिद्ध झाला.

यानंतर २००९ मध्ये संग्रामपूर येथील प्रथम श्रेणी न्यायिक दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला भादंवि कलम ३७७ अंतर्गत दोषी ठरवत तीन वर्षांची सक्तमजुरी व १५ हजारांचा दंड ठोठावला. अपील न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला. यानंतर आरोपीने पुनर्विलोकनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याचा दावा होता की पुरावे अपुरे असून डॉक्टरांनी अनैसर्गिक कृत्याबाबत ठाम मत दिले नाही. मात्र, न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले की वैद्यकीय अहवाल अंतिम नसला तरी प्रत्यक्ष साक्षी व परिस्थितीजन्य पुरावे ठोस आहे. बालिकेच्या आजीला खोटा गुन्हा लावण्याचे कोणतेही कारण नाही. फॉरेन्सिक तपास, रक्ताचे डाग आणि बालिकेची स्थिती हे सर्व आरोपीविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. कनिष्ठ न्यायालयांचे निर्णय योग्य असल्याचे सांगून आरोपीची पुनर्विलोकन याचिका फेटाळण्यात आली. आरोपीची तीन वर्षांची शिक्षा व दंड कायम ठेवण्यात आला. याचिकाकर्ता आरोपीच्यावतीने ॲड. अनिकेत सावल यांनी युक्तिवाद केला तर राज्य शासनाच्यावतीने ॲड. एन.आर. पाटील यांनी बाजू मांडली. पीडितेच्या आजीकडून ॲड. यू.व्ही. चक्रवर्ती यांनी युक्तिवाद केला.