नागपूर : छोटा मटका…. नाम ही काफी है… प्रचंड मारामारी करून गडी सध्या जखमी आहे … बरंच लागलं आहे ..पण गड्याला काही फिकर नाही …अलिझंझा गेट मधून सफारीला गेलो..तेव्हा हा दिसेल याची कल्पना ही केली नव्हती ..केवळ ड्रायव्हरने त्याच्या अंतप्रेरणेने गाडी इकडे नेली …आणि .. गडी..रस्त्यावर साचलेल्या पाण्यात निवांत पहुडला होता …त्याला असा निवांत पाहून सहज टॅक्सी ड्रायव्हर या देव आनंद च्या सिनेमातील गाण्याची आठवण झाली … ***चाहें कोई खुश हो ..चाहें गालिया हजार दे.. मस्तराम बनके अपनी जिंदगी गुजार दे …

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील “छोटा मटका” हा वाघ दिसल्यानंतर हा आनंद व्यक्त केलाय अमरावतीचे अप्पर आयुक्त व वन्यजीवप्रेमी छायाचित्रकार गजेंद्र बावणे यांनी. “छोटा मटका” हा खरोखरच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील डॉन आहे. त्याच्या अधिकारक्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तीन वाघांना त्याने आतापर्यंत यमसदनी धाडले आहे. त्यांच्याशी झालेल्या तुंबळ लढाईत तो देखील भयंकर जखमी झाला. त्याच्याही जीवावर बेतले. तो उठू शकेल की नाही अशी स्थिती असताना तो पुन्हा नव्याने उभा राहिला.

“छोटा मटका” हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील एक प्रमुख नर वाघ आहे. तो त्याच्या प्रभावशाली स्वभावासाठी आणि प्रादेशिक वादांसाठी ओळखला जातो. तो प्रसिद्ध वाघीण “छोटी तारा” आणि शक्तिशाली वाघ “मटकासुर” यांचा मुलगा आहे. “छोटा मटका” या वाघाने “मोगली” आणि “बजरंग” या दोन वाघांसह इतर प्रभावी वाघांकडून आलेल्या आव्हानांना तोंड दिले आहे आणि त्याने एका विशाल प्रदेशावर आपले साम्राज्य स्थापित केले आहे.

“छोटा मटका” या वाघाने इतर प्रभावी नर वाघांसोबत अनेक प्रादेशिक वाद आणि भयंकर लढाया केल्या आहेत. त्यातील गाजलेल्या लढाया म्हणजे “मोगली” आणि “छोटा मटका”. यात “मोगली” हा वाघ “छोटा मटका” एवढाच शक्तिशाली होता. पण “मोगली”च्या साम्राज्यावर अतिक्रमण करत “छोटा मटका”ने अखेर त्याला नमवले. तर “बजरंग” हा वाघ देखील आजपर्यंत एकही लढाई हरलेला नव्हता, तरीही “छोटा मटका”ने त्याला नमवलेच नाही, तर थेट यमसदनी धाडले. या लढाईचे अनेक पर्यटक साक्षीदार होते. तर ताडोबा-अंधारी व्याघरप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील आणखी एका वाघाला “छोटा मटका”ने लढाई करत यमसदनी धाडले. अनेक आव्हानांवर मात करत आणि ताडोबात एक प्रमुख वाघ म्हणून स्वतःला स्थापित केले. अनेक लढायांमुळे तो जखमी झाला आहे. त्याच्या पायाला कायमचे दुखणे लागले आहे. तरीही तो खंबीर आहे.