यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील चार गावातील मजुरांच्या बँक खात्यात गेल्या तीन महिन्यात कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याची बाब पुढे आली आहे. पांढरकवडा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून हे व्यवहार झाले असून, अनेक मजुरांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. यामुळे बँक आणि पोलीस प्रशासन हादरले आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या पांढरकवडा शाखेत तालुक्यातील चोपण, वाघोली, वसंतनगर, दहेली तांडा या चार गावातील मजुरांचे पॅन कार्डशिवाय खाते उघडण्यात आले होते. रोजगार हमी योजनेत कामे मिळवून देतो असे सांगून गावातील मयूर चव्हाण व साथीदार मनोहर राठोड याने अनेकांची कागदपत्रे गोळा करून परस्पर त्यांच्या नावावर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाती उघडली आणि या खात्यात आलेले कोट्यवधी रुपये परस्पर काढले, असा आरोप आहे. खात्यांच्या तपशीलावरून या मजुरांच्या खात्यात १४ मार्चपासून ३० जून दरम्यान सतत मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑनलाईन गेमिंग किंवा क्रिकेट सट्ट्यातील व्यवहाराचा काळा पैसा हेरफेर करण्यासाठीच गरीब मजुरांचे बँक खाते वापरले, अशी चर्चा आहे. तक्रारी दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पांढरकवडा पथकाने बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकांकडून व्यवहार झालेल्या खात्याचे स्टेटमेंट घेत चोपण येथील आठ मजुरांचा जबाब नोंदविला. परंतु, यातील मुख्य सूत्रधार मोकाट आहे.
चोपण गावातील मयूर चव्हाण आणि मनोहर राठोड या दोघांनी रोजगार हमी योजनेचे आमिष दाखवून गावातील मजुरांचे कागदपत्रे गोळा केली आणि त्यांच्याच नावे बँक ऑफ महाराष्ट्रच्या पांढरकवडा शाखेत खाती उघडली. या प्रकरणात या दोघांना भद्रावती येथून मदत करणारे राहुल शेडमाके व अल्ताफ अकबानी यांची नावे समोर आली आहे. तरी देखील या कटाचा मुख्य सूत्रधार अजूनही पसार असल्याचे बोलले जात आहे. तेलंगणा, हैदराबाद येथील क्रिकेट सट्टा आणि ऑनलाइन गेमिंगचे केंद्र पांढरकवडा येथे आहे. यापूर्वीही येथे सट्टेबाजांवर कारवाई झाली आहे.
या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षकाशी मेळ जमवून देणाऱ्या यवतमाळच्या दलालाचा शोध घेतल्यास नवीन माहिती पुढे येऊ शकते. क्लिष्ट अश्या प्रकरणात पोलीस आणि बँकेची भूमिका सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हा १०० कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष संतोष बोरेले यांनी केला आहे.
वाघोली येथील ११ जणांव्या खात्यात पैसे जमा झाले व नंतर काढण्यात आले. या प्रकरणी नीलेश घनश्याम राठोडसह ११ जणानी ६ जुलै रोजी पांढरकवडा पोलीस ठाण्यात मयूर राजू चव्हाण रा., चोपन याच्याविरोधात तक्रार दिली आहे. सदर प्रकरण पोलिसांमुळे उघडकीस आले असून ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले त्यांचीही चौकशी केली जाईल, हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले, अशी माहिती पांढरकवडा ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश झामरे यांनी दिली.
बँकेची भूमिका संशयास्पद
झिरो बॅलन्सवर उघडलेल्या खात्यात झालेल्या लाखोंच्या व्यवहारावर बैंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा व्यवस्थापनाने संशय घेतला नाही. याचप्रमाणे २० जणांच्या खात्यातूनही आर्थिक उलाढाल झाली आहे. यूपीआयद्वारे पैसे जमा झाले आणि त्याच पद्धतीने ते काढून घेण्यात आले आहे. मजुरांकडे पॅनकार्ड नाही, त्यानंतरही त्यांच्या सेव्हिंग अकाऊंटमधून तीन महिन्यांतच लाखो व कोट्यवधींचे व्यवहार झाले कसे? हा प्रश्न असून या प्रकरणात बँकेची भूमिका संशयास्पद आहे.