महिलांना ३३ टक्के आरक्षण आणि ५० टक्के महिला मतदारांचा गाजावाजा मोठा होत असला तरी महिलांचे प्रश्न आणि त्यांची सोडवणूक याबाबतीत उमेदवार आणि स्वत: मतदारही अज्ञानात असल्याचे प्रभागातील भटकंतीवरून स्पष्ट दिसते. उमेदवार स्त्री असो की पुरुष असो त्यांना महिलांचे प्रश्न विचारले तर पाणी, रस्ते, गडरलाईन, वीज याच्याशिवाय दुसरे काही माहिती नाही. अद्यापही उमेदवारांना आणि मतदारांनाही महिलांच्या समस्या हुडकता आल्या नाहीत. त्यामुळे त्या सोडवण्याचा प्रश्नच दूर राहतो.

नागपुरातील कोणत्याही रस्त्यावरून एकातरी पक्षाच्या प्रचाराचा भोंगा ऐकायला येतोच. रस्तोरस्ती पक्षाचे कार्यालय तरी असते. महिला कार्यकर्त्यांची वाणवा मात्र, सर्वच पक्षांच्या कार्यालयात दिसून येते. महिलांना प्रचार कामासाठी मोठी मागणी आहे. मात्र, महिलांचे प्रश्न ना उमेदवाराला कळत ना त्या प्रचारकर्त्यां महिलांना! महिलांच्या कुठल्या समस्या तुमच्या भागात प्रबळ आहेत किंवा महिलांच्या कोणत्या समस्या निवडून आल्यावर आपण सोडवू इच्छिता या प्रश्नांवर उमेदवार चिडीचूप असतात. कारण अद्यापही त्यांना महिलांच्या समस्या समजल्याच नसल्याचे नाईलाजाने म्हणावे लागेल. शारदा चौक, चक्रधरनगर, दत्तात्रयनगर, आशीर्वादनगर या भागातील अनेक महिलांचे प्रश्न रोजगाराशी जुळलेले आहेत. काम करायला तयार आहोत पण, हातांना कामे नाहीत. केवळ घरी बसून काय करायचे. त्यापेक्षा दोनपैसे कमावले तर तेवढाच वेळ जाईल पण, या भागात कोणतेही उद्योगधंदे नाहीत किंवा एखादा कारखाना नाही. तेव्हा महिलांनी सर्वानी मिळून काहीतरी करावे आणि त्यासाठी नगरसेवकाने मदत करावी, अशी मागणी या भागातील महिलांकडून आली आहे.

रत्नमाला सनकाळे यांनी मिळणारा रोजगार आणि खर्चाचे वेळापत्रक जुळताजुळत नसल्याची खंत व्यक्त करीत. महिलांसाठी या भागात काहीतरी काम उभे राहायला पाहिजे आणि त्यासाठी नगरसेवकांनी शासकीय योजना राबवायला हव्यात, अशी स्पष्ट भूमिका मांडली. कांता जोगे भंडारा मार्गावरील गुमथळा येथे शाळेत शिक्षिका आहेत. त्यांच्या घरासमोरच्या मलवाहिनीच्या समस्येमुळे सांडपाण्याचे प्रश्न निर्माण होतात, अशी आपबिती मांडली.

मी तर अशाच उमेदवाराला निवडून देईल. ज्याच्या घरी एखादी समस्या मांडायला सहज जाता येईल. नाहीतर हाय-फाय उमेदवाराच्या घरी गेले की आधी कुत्रेच बाहेर येतात. ते भू भू करीत राहतात. पण कोणी बाहेर येत नाही. आपले छोटेसे काम ज्या उमेदवारापर्यंत सहज घेऊन जाता येईल, त्याच उमेदवाराला मी ‘वोट’ देईल, अशी स्पष्ट व्यवहारवादी दृष्टिकोण एका मतदाराने ठेवला आहे.

प्रभाग ३०मध्ये एक मुस्लिम महिला उमेदवार निवडणुकीसाठी उभ्या आहेत.  त्यांचे यजमान काही वर्षांपूर्वी अपक्ष म्हणून निवडणूक लढले. त्यांनी अनेक वर्ष  काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम केले. मात्र, त्यांना उमेदवारी न दिल्याची खंत वारंवार त्यांच्या बोलण्यातून डोकावत होती.  मात्र, महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक तर दूर पण, महिलांचे प्रश्न सुद्धा ते सांगू शकले नाहीत.

पोरं चेन स्नॅचिंग करणार नाही तर काय?

नुसते रस्ते आणि पाणीच लोकांना देत राहणार का? पाणी पिऊन काय पोट भरते? खायलाही लागते माणसांना! तरुण मुले रोजगारासाठी धडपडतात. त्यासाठी कोणता उमेदवार काम करतो. एमआयडीसीमध्ये बंद पडलेले कारखाने  सुरू करण्यासाठी नगरसेवक कोणते प्रयत्न करतात. मॉडेल मिल बंद झाली. मात्र मॉडेल मिलने अनेकांच्या हातांना कामे दिली.   कामे नाहीत, मग पोरं बायकांचे मंगळसूत्र ओढून नेतील नाही तर काय? असा त्रागा शारदा चौकात घर असलेल्या एका आजीबाईने व्यक्त केला.