नागपूर : शहरात रोज अनेक नागरिक मद्यप्राशन करून वाहन चालवतात. परंतु, वाहतूक पोलिसांनी पाच महिन्यांत केवळ ७०६ जणांवरच कारवाई केल्याची माहिती उघडकीस आली आहे. जानेवारी ते २४ मे २०२४ पर्यंत पाच महिन्यांत वाहतूक पोलिसांनी केवळ ७०६ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४ लाख ६१ हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

शहरातील बारची संख्या, तेथे मद्यप्राशन करणाऱ्यांची दैनंदिन संख्या लक्षात घेता मद्यपी वाहनचालकांवर करण्यात आलेली कारवाई नगण्य स्वरूपाची असल्याचे निदर्शनास येते. वाहतूक पोलिसांचा हलगर्जीपणा असाच कायम असला तर रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – डबल डेकर उड्डाणपुलामुळे कोंडी, नागपूरकर त्रस्त, विमानतळ चौकात…

शहरात वाहतूक शाखेकडून नियम पालनाबाबत जनजागृती केली जाते. मात्र, कारवाईत सातत्य नसल्यामुळे वाहतूक पोलिसांचा धाक उरला नाही. पोलीस चौकात हजर राहात नाहीत. बाजूला झाडाखाली ‘सावज’ शोधत असतात, असे सार्वत्रिक चित्र आहे. सध्या मद्यप्राशन करून वाहन चालवण्याचा मुद्या चर्चेत आहे.

चौकाचौकातील बारजवळ तपासणी केली तर दररोज शेकडो मद्यपी चालक पोलिसांच्या जाळ्यात अडकू शकतात. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर २ हजारांपेक्षा जास्त दंडाची तरतूद आहे. त्यांचे वाहनही जप्त केले जाते. न्यायालयात दंड भरून वाहन परत घ्यावे लागते. बारमधून बाहेर पडणाऱ्या वाहनचालकांना पोलीस पकडतात. दंडात्मक कारवाई करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे घेऊन सोडून देत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. दंड आणि न्यायालयाच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी वाहतूक पोलिसांना पैसे देऊन वाहनचालक स्वतःची सुटका करतात.

१२ अल्पवयीन चालकांवर कारवाई

अल्पवयीन मुलांकडून पुण्यात घडलेली अपघाताची घटना ताजी आहे. नागपुरातही अल्पवयीन मुले दुचाकी चालवताना दिसतात. परंतु, गेल्या पाच महिन्यांत नागपुरात फक्त १२ अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. मुलांच्या पालकांकडून ६० हजार रुपये दंड वसूल केला. नियमानुसार अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देणाऱ्या पालकांवरही कारवाई करणे अपेक्षित असते. मात्र, वाहतूक पोलीस ही कारवाई करीत नाही, तसेच पालकांचेही समुपदेशन करीत नाही.

हेही वाचा – संजय राऊत यांच्या आरोपाने नागपूरचे भाजप नेते संतप्त; मला कोणाकडून रसद घेण्याची गरज नाही-विकास ठाकरे

५ महिन्यांत ११० जण अपघातात ठार

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवल्यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या पाच महिन्यांत शहरात झालेल्या रस्ते अपघातात ११० जण ठार झाले आहेत. मागील वर्षी नागपुरात १ हजार ३३० अपघातांची नोंद असून त्यात ३८२ जण ठार झाले.

वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येते. प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून रस्ते अपघाताबाबत जनजागृती केली जाते. अल्पवयीन चालकाच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येते. तसेच मद्यपी चालकांविरुद्ध विशेष अभियान राववण्यात येते. – जयेश भांडारकर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.