नागपूर : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी नागपुरात सुरक्षा यंत्रणेबाबत आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर काही तासानंतर रात्री नागपुरातील पोलीस मदत कक्षाला एक फोन आला. त्यात काटोल पोलीस बिल्डिंग, नागपुरातील ग्रामीण पोलीस वसाहत बाॅम्बने उडवून देण्याची धमकी दिली गेली. ही माहिती वरिष्ठांना कळताच त्यांचे धाबे दणाणले. हे नेमके काय प्रकरण आहे ? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपूर येथे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धा होणार आहे. त्याच्या तयारीसह सणासुदीच्या उत्सवात कायदा व सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी नागपूर पोलिसांची बैठक घेत कडक इशारा दिला होता. याप्रसंगी पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल आणि इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली होती. बैठकीत शुक्ला यांनी सणासुदीच्या काळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस दलाने सतर्कतेने आणि त्वरीत कारवाई करण्याची तयारी ठेवण्याचा इशारा दिला होता.
बैठक आटोपल्यावर काही तासानंतर नागपुरातील पोलीस मदत क्रमांक ११२ वर मंगळवारी रात्री एक फोन आला. त्यात काटोल येथील पोलीस बिल्डिंग, नागपूर ग्रामीण पोलीस वसाहत बाॅम्बने उडवून देणार असल्याची धमकी दिली गेली. हे वाक्य एकून मदत कक्षावरील कमर्चाऱ्याचे धाबे दणाणले. त्याने तातडीने वरिष्ठांना धमकीबाबत कळवले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने विविध यंत्रणेला सक्रिय करत फोन करण्याचा शोध सुरू केला. दुसरीकडे धमकी मिळालेल्या भागातही काही अनुचित प्रकार बघण्यात आला काय? त्याबाबतही तपास सुरू झाला. शेवटी रात्रभर धावपळ केल्यावर पोलिसांना एका तरुणाने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात कळले. त्याला बुधवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर तरुण हा फेक काॅल करण्याच्या वृत्तीचा असल्याचे पुढे येत आहे. त्यावर पोलिसांकडून सुमारे एक महिन्यापूर्वी गांजा प्रकरणात कारवाईही केली होती. या कारवाईचा सूड घेण्यासाठी त्याने हे कृत्य केले काय? त्याबाबतही पोलीस तपास करत आहे.
नागपूर ग्रामीण पोलीस अधिक्षकांचे म्हणने काय ?
सदर प्रकरणात लोकसत्ताने नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांना याबाबत विचारना केली असता त्यांनी या पद्धतीचा ११२ क्रमांकावर धमकी देणारा भ्रमनध्वनी आल्याचे मान्य केले. तर हे कृत्य करणारा फेक काॅल करण्याच्या वृत्तीचा असल्याचे पुढे येत असल्याचीही माहिती त्यांनी दिली. परंतु नागरिकांनी घाबरण्याचे काही कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले.