नव्या पालवीसाठी बांबू तोड केल्याचा वनखात्याचा दावा; निसर्गप्रेमींची तीव्र नाराजी
जैवविविधता उद्यानासाठी अंबाझरीच्या मूळ जैवविविधतेवर पोकलेन चालवून ती नष्ट करण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता सेमिनरी हिल्सवरील बांबूच्या हिरवळीबाबतही तसाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. वनखात्याच्या हद्दीतील हिरवळीची वनखात्याकडूनच होणाऱ्या तोडीवर निसर्गप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नव्या पालवीसाठी बांबू तोड केल्याचा दावा वनखात्याने केला आहे.
हिरवळीच्या यादीत नागपूर शहराचा क्रमांक पहिल्या पाच शहरांमध्ये येतो. या शहरातील अर्धीअधिक हिरवळ सेमिनरी हिल्स या वनखात्याच्या हद्दीतील परिसरात आहे. सेमिनरी हिल्सचे वैभव गेल्या काही वर्षांत लोप पावले आहे. या ठिकाणचे जपानी गार्डन म्हणजे नागपूरकरांसह इतरही शहरातून येणाऱ्या नागरिकांचे आकर्षण होते. येथील बालोद्यान आणि वनबाला लहान मुलांसाठी आकर्षणाचे केंद्र होते. वनखात्याला हे वैभव टिकवून ठेवता आले नाही आणि केवळ बांबूच्या रांजींनी थोडेफार वैभव टिकवून ठेवले. पावसाळा आणि हिवाळयात हा परिसर हिरवागार आणि ‘हिल स्टेशन’ची अनुभूती देतो. त्यामुळे या परिसरात सकाळी व सायंकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांचीही संख्या मोठी आहे. याठिकाणी नानाविध पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. पक्षीप्रेमींसाठी हा परिसर म्हणजे पक्षी निरीक्षण व अभ्यासासाठी एक उत्तम ठिकाण आहे. मात्र, काही दिवसांपासून इथल्या बांबूंच्या रांजी नष्ट करण्याचा प्रकार वनखात्याकडून सुरू झाल्याने निसर्गप्रेमींनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. उन्हाळ्यात शहरातील तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सिअसच्या वर जात असताना रणरणत्या उन्हात या हिरवळीची तोड करण्याचे कारण काय, असा प्रश्न निसर्गप्रेमींनी उपस्थित केला. कधीकाळी थंड होणारे हे शहर आता सायंकाळीसुद्धा थंड होत नाही. त्यामुळे अनेकजण सेमिनरी हिल्स परिसरात फिरायला येतात. उन्हाच्या झळांपासून थोडीफार सुटका करून घेण्यासाठी हा तात्पुरता पर्याय त्यांना बराच उपयोगी ठरतो, पण ऐन उन्हाळयात बांबूच्या रांजीवर कुऱ्हाड चालवण्यात आल्याने त्यांनी वनखात्याच्या या कृतीवर आक्षेप घेतला आहे. कायदेशीररित्या ही बांबूतोड होत असली तरीही उन्हाळयातच का, या ठिकाणी पक्ष्यांचा अधिवास असताना भर तापमानात जिथे माणसांनाही सावलीची गरज भासते तिथे पक्ष्यांचे काय, असे नानाविध प्रश्न याठिकाणी फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी आणि निसर्गप्रेमींनी उपस्थित केले.
उन्हाळ्यात बांबूतोड आवश्यक
पावसाळयात नवा बांबू उगवत असल्याने पावसाळयाच्या आधी उन्हाळयात त्याची तोड केली जाते. पावसाळयात चांगली हिरवळ उगवावी म्हणून साधारणपणे उन्हाळयात झाडांच्या फांद्या कापणे, तोड करणे अशी कामे केली जातात. सेमिनरी हिल्स परिसरातील या बांबूंवर गेल्या चार-पाच दशकांपासून स्वच्छता झालेली नव्हती. त्याचा परिणाम बांबूंच्या रांजीवर झाला होता. त्यामुळे बांबू तोड करणे आवश्यक होते. आज जरी नागरिकांना बांबू तोड वाटत असली तरीही पावसाळयात हेच नागरिक इथल्या नव्या हिरवळीवर अधिक खूष होतील, असे सेमिनरी हिल्सचे वनपरिक्षेत्र अधिकारी कोलनकर म्हणाले.\