नागपूर : प्रयागराज येथे सध्या सुरू असलेल्या महाकुंभादरम्यान त्रिवेणी संगमावर करोडो लोक पवित्र स्नानाचा लाभ घेत आहेत. पण ज्यांना तेथे जाणे शक्य नाही अशांनाही या पवित्र संगम जल दर्शनाची अनुभूती घेता यावी, या अनुषंगाने तेथील हजारो लिटर पवित्र जल बुधवारी रामटेक येथे आणण्यात आले. या पवित्र संगम जलाचे रामटेककरांनी गांधी चौक येथे ढोलताशाच्या गजरात भव्य स्वागत केले. यावेळी रामटेककरांनी या पवित्र जलावर पुष्पवर्षावदेखील केला. त्यानंतर गांधी चौक ते गडमंदिर, अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.
शोभायात्रेच्या मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. महिलांनी या पवित्र जलाचे ओवाळून स्वागत केले व पुष्पवृष्टी केली. १३ फेब्रुवारी रोजी रामटेक गडमंदिरात प्रभू श्रीरामाला या पवित्र जलाद्वारे अभिषेक केला जाणार आहे. त्यानंतर हे पवित्र जल कलश नागपूरकडे रवाना होणार असून सकाळी ८ वाजता कल्याणेश्वर मंदिर, तेलंगखेडी येथे येणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता राममंदिर रामनगर, ९.४० वाजता दुर्गा मंदिर प्रतापनगर, १०.३० वाजता टेकडी गणपती मंदिर, सकाळी ११.३० वाजता कल्याणेश्वर मंदिर महाल तर दुपारी १२.१५ वाजता रमणा मारुती मंदिर हे पवित्र जल कलश आणले जातील. कांचनताई गडकरी, अमेय हेटे, अभय व अंजली चोरघडे, नरेंद्र हेटे, साकेत दशपुत्र, आशुतोष शेवाळकर, रवी वाघमारे, काळे, राजेश अवचट, गुणवंत पाटील, डॉ. राजेश रथकंठीवार यांची उपस्थिती राहील.
© The Indian Express (P) Ltd