तारखा जाहीर, परीक्षा पद्धतीचा निर्णय मात्र नाहीच

८ जूनपासून पदवी अंतिम वर्षांच्या तर १५ जूनपासून पदव्युत्तर अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार आहेत.

८ जूनपासून पदवी तर १५ जूनपासून पदव्युत्तर अंतिम वर्षांच्या परीक्षा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर उन्हाळी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या, मात्र परीक्षा पद्धतीचा निर्णय अद्यापही गुलदस्त्यात ठेवला आहे. अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा असल्याने विद्यापीठाने त्यांच्या परीक्षा आधी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

८ जूनपासून पदवी अंतिम वर्षांच्या तर १५ जूनपासून पदव्युत्तर अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार आहेत.  अंतिम वर्ष वगळता इतर वर्षांच्या परीक्षांना २२ जूनपासून सुरुवात होणार आहे. परीक्षा मंडळाच्या बैठकीत ‘ऑनलाईन’ परीक्षेबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विद्यापीठाने तयारीही केली होती. मात्र, ऐनवेळी कुलगुरूंच्या बैठकीत ‘ऑफलाईन’चा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विद्यापीठाने लवकरात लवकर परीक्षेबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, याला वीस दिवसांपेक्षा जास्तीचा कालावधी उलटल्यानंतरही विद्यापीठाकडून कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी बुधवारी बैठक घेतली. त्यामध्ये ८ जुनपासून परीक्षा घेण्याचे ठरवण्यात आले. पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षांच्या परीक्षा ८ जूनपासून आणि १५ जूनपासून सर्वच पदव्युत्तर अभ्यासक्रमातील अंतिम वर्षांच्या परीक्षा, २२ जूनपासून इतर सर्वच अभ्यासक्रमातील सम सत्रांच्या परीक्षा घेतल्या जातील. मात्र, या परीक्षा कुठल्या स्वरूपात होतील, याचा निर्णय अद्यापही घेण्यात आलेला नाही. यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहे.

परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णयाची अपेक्षा

परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत परीक्षेबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विद्यापीठ मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दिली. यापूर्वी ऑनलाईन परीक्षेबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आता पुन्हा याच प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घ्यावा लागणार आहे.

परीक्षेच्या तारखा अशा..

* पदवी अभ्यासक्रम अंतिम वर्ष परीक्षा : ९ जून

* पदव्युत्तर अभ्यासक्रम अंतिम वर्ष परीक्षा : १५ जून * सर्व अभ्यासक्रमातील सम सत्रांच्या परीक्षा : २२ जून

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur university to begin exams for undergraduate students from june 8 zws

Next Story
जलस्रोत जुनेच, लोकसंख्येत दहा लाखांनी वाढ, पाणी पुरणार कसे?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी