नागपूर : उपराजधानीत वन्यप्राण्यांचा शिरकाव वाढत चालला आहे. हरिण, निलगाय, मोर यांच्यासह बिबट्यानेही शहरात घुसखोरी केली आहे.मात्र, प्रत्येकवेळी ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या चमुने कोणताही संघर्ष होऊ न देता जीव धोक्यात घालून वन्यप्राण्यांचे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ राबवले आहे. मात्र, आता चक्क मेट्रोच्या रुळावरच वन्यप्राण्याने ठाण मांडले. एवढेच नव्हे तर मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना पळता भूई थोडे केले. मात्र, यावेळी देखील प्रादेशिक वनखात्याच्या अखत्यारितील सेमिनरी हिल्सच्या ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या चमुने अक्षरश: जीव धोक्यात घालून या प्राण्याला जेरबंद केले. यापूर्वी देखील मेट्रोच्या तारांमध्ये अडकलेल्या पोपटाला ‘रेस्क्यू’ करण्यात आले.
शनिवार, २७ सप्टेंबरला मेट्रो प्रशासनाने ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राला कॉल केला. काँग्रेसनगर ते अजनी मेट्रो स्थानकादरम्यान सायाळ हा काटेरी वन्यप्राणी मेट्रोच्या रुळावरुन धावत असल्याची माहिती त्यांनी केंद्राला दिली. यावेळी केंद्राचे वनपाल सुधाकर मरसकोल्हे, बंदू मगर, चेतन बारस्कर, वाहनचालक स्वप्नील भूरे यांचा समावेश असलेले बचाव पथक तातडीने तयार मेट्रो स्थानकावर गेले. मेट्रोचे कर्मचारी दिलेश मेश्राम त्यांच्यासोबत होते.
सायाळ या काटेरी वन्यप्राण्याला पकडण्याचा थरार सुरू झाला. कधी मेट्रोत बसून रुळावर अर्ध्यात जाऊन मेट्रो थांबवणे आणि सायाळच्या मागे धावणे तर कधी मेट्रोने त्याचा पाठलाग करणे. काँग्रेसनगर ते अजनी स्थानकादरम्यान तब्बल तासभर ही मोहीम सुरू होती. त्यात पावसाने अडचण निर्माण केली. रुळाच्या आजूबाजूला शेवाळ पसरलेले होते. त्यामुळे पाय घसरुन दुखापत होण्याची शक्यताही अधिक होती. त्याचवेळी मेट्रोचे कर्मचारी दिलेश मेश्राम शेवाळवरुन पाय घसरुन पडले. त्यांचा मोबाईल तर फुटलाच, पण पायाला व पाठीला गंभीर दुखापत झाली. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ट्रान्झिटचे शिपाई बंडू मंगर, चेतन बारस्कर, स्वप्नील भुरे यांनी जोखीम स्विकारुन काटेरी सायळला जेरबंद केले. या प्राण्याला पकडणे सोपे नाही, कारण त्याला धारदार काटे असतात. मात्र, त्याही परिस्थितीत या लोकांनी त्याला रुळावरून सुरक्षित पकडले व ट्रांझिटला आणले.
उपराजधानीत वन्यप्राण्यांचा शिरकाव वाढत चालला आहे. मेट्रोच्या रुळावरच वन्यप्राण्याने ठाण मांडले.https://t.co/2jrmCKw8Ui#Metro pic.twitter.com/n1ycCrbDlj
— LoksattaLive (@LoksattaLive) September 27, 2025
सायाळची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तो जखमी नसला तरीह रुळावर धावल्यामुळे त्याला कमजोरी आलेली आहे.त्याच्या आरोग्यात सुधारणा दिसून आल्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार आहे.यापूर्वीदेखील ट्रान्झिटच्या चमुने मेट्रो रुळावरुन पोपटाचे सुरक्षित रेस्क्यू केले.मेट्रोच्या रुळावर हा काटेरी वन्यप्राणी पोहोचलाच कसा हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.रोज नवीन नवीन आव्हाने येत आहेत, टीम अविरत काम करत आहे. आणि करतच राहणार.