चंद्रपूर : चंद्रपूर येथील कारमेल अकादमी विद्यालयाच्या इयत्ता दहाव्या वर्गात शिकणाऱ्या निशिता खाडिलकर हिने लिफोलॉजी वैश्विक फेलोशिप सत्र – २ चा डायमंड एस. पुरस्कार जिंकला आहे. हा पुरस्कार जिंकल्यामुळे निशिताला नासा अवकाश संशोधन केंद्रात जाण्याची संधी मिळाली आहे.
लिफोलॉजीद्वारे दुसऱ्या सत्रासाठी फेलोशिपचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली असून यामध्ये देश-विदेशातील वर्ग ८ वी ते १२ वी च्या ४० हजार विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला. पहिल्या आलेल्या १० हजार विद्यार्थ्यांमधून एक हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. अनेक प्रकल्प, पीपीटी सादरीकरण केल्यानंतर निशिताची पुरस्कारासाठी निवड झाली. ती एकमेव विद्यार्थिनी असून तिला या पुरस्कारासह नासाच्या अवकाश संशोधन केंद्रात मोफत जाण्याची संधी मिळाली आहे. शाळेचे व्यवस्थापक रेव्ह. सेबॅस्टियन, मुख्याध्यापिका कविता नायर यांनी निशिताच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. निशिताने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षकांना दिले आहे.