नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गृहशहर असल्याने त्यांनी नागपुरात अनेक उड्डाणपूल बांधले. रहाटे कॉलनी ते सीताबर्डी दरम्यानचा पूलही त्यातलाच एक. मुख्य रस्त्यावर होणारी वाहनांची गर्दी कमी व्हावी व बर्डीला न थांबता त्यापुढे जाणाऱ्यांना थेट जाता यावे, यासाठी रहाटे कॉलनी ते सीताबर्डी या दरम्यान उड्डाणपूल बांधण्यात आला. मात्र त्यामुळे मुख्य रस्त्यावरची वाहतूक कोंडी काही सुटलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हेरायटी चौकात पुलाखाली वाहतुकीची कोंडी कायम असल्यामुळे या उड्डाणपुलाचा नेमका उपयोग काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वर्धा मार्गाहून येणाऱ्या व संविधान चौक, सिव्हील लाईन्समधील सरकारी कार्यालयांकडे जाणाऱ्यांसाठी उड्डाणपूल सोयीचा आहे. तिकडे जाणारे मोठ्या संख्येने या पुलाचा वापर करतात. कारण त्यांना कुठेही सिग्नल लागत नाही. परंतु पुलामुळे खालच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी झालेला नाही. तो आहे तसाच आहे. कारण बर्डी, रामदासपेठ, धंतोली हा परिसर बाजारपेठांचा आहे. रुग्णालयांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे उड्डाणपुलापेक्षा अधिक गर्दी खालच्या रस्त्यावर असते.

हेही वाचा – नागपुरातील आरटीई घोटाळ्याचा आरोपी शाहिद शरीफ सापडेना, हाती लागल्यास अनेक अधिकाऱ्यांसह…

खांबामुळे खोळंबते वाहतूक

सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या अगदी समोर मेट्रो रेल्वेच्या पुलाचा भला मोठा खांब उभा आहे. त्यामुळे पंचशिल चौकाकडून येणारी वाहने सरळ मॉरेस कॉलेज चौकाकडे जाताना खांबामुळे दोन भागात विभागल्या जातात. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. तसेच अगदी सीताबर्डी पोलीस ठाण्यासममोरूनच ऑटोचालकांनी अवैधरित्या ऑटोस्टँड बनविले आहे. दिवसभर पोलीस ठाण्याच्यासमोर ऑटोचालक आणि प्रवाशांची गर्दी असते.

वाहतूक पोलीस मोबाईलमध्ये व्यस्त

व्हेरायटी चौकात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची सर्वात मोठी संख्या आहे. चौकात वाहतूक पोलीस कारवाई करण्याऐवजी मोबाईलवर व्यस्त असतात. त्यामुळे अनेक वाहनचालक ‘रॉंग साईड’ आणि सिग्नल तोडून पळतात. सीताबर्डी चौकात अगदी पदपाथ सोडून रस्त्यावर अतिक्रमण आले आहे. दुकानदारांनी रस्त्यावर लावलेल्या हातठेल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. वाहतूक पोलिसांचा वचक नसल्यामुळेच व्हेरायटी चौकातील स्थिती दयनीय आहे.

हेही वाचा – वाशिम : वारंवार वीज जात असल्याने नागरिक संतापले, महामार्गच रोखून धरला!

व्हेरायटी चौकाला ऑटोचालक आणि हातठेल्यावाल्यांनी पूर्णपणे घेरले आहे. उड्डाणपूल झाल्यामुळे व्हेरायटी चौकात वाहतूक कोंडी होणार नाही, असे वाटत होते. परंतु, या चौकात नेहमीच वाहतूक कोंडी असते. वाहतूक पोलिसांनी थोडे गांभीर्य दाखवायला हवे. – पंकज यादव (विद्यार्थी)

सीताबर्डी मुख्य बाजारपेठेसह, मोरभवन बसस्थानक, महाराज बाग, मोठमोठे शॉपिंग कॉम्पलेक्स तसेच सिनेमागृह या भागात आहेत. त्यामुळे वाहनांची संख्या तसेच ग्राहकांचीही गर्दी नेहमी असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. ती कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात केलेले असतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते. – अनिरुद्ध पुरी (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सीताबर्डी वाहतूक विभाग)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari built many flyovers in nagpur but did something go wrong adk 83 ssb