साहित्यविश्वात केवळ महाराष्ट्राचेच नाही, तर साऱ्या भारताचे भूषण असलेले ज्येष्ठ कवी सुरेश भट. आयुष्यभर कविता, गझल हाच खजिना समजून साहित्यविश्वात त्यांनी वेगळा ठसा निर्माण केला होता. विविधांगांनी परिपूर्ण असलेल्या सुरेश भटांच्या गझलांची भूरळ नवोदित किंवा ज्येष्ठ कवींना न पडली तरच नवल. त्यामुळे त्यांच्या हयातीत नव्या दमाची एक गझलकार पिढी तयार झाली. मात्र, या नव्या पिढीसह साहित्यक्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना त्यांच्या स्मृतिदिनाचा विसर पडला की काय?, असे वाटत आहे.
साहित्यविश्वात नागपूरचे वैभव म्हणून जी काही मंडळी ओळखली जात होती त्यात सुरेश भट यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या निधनानंतर साधारणत: दरवर्षी साहित्यक्षेत्रातील मंडळी, संस्था किंवा त्यांच्या चाहत्यांच्यावतीने आठवणींना उजाळा देणारे सांस्कृतिक कार्यक्रम केले जात होते. गेल्या वर्षीपर्यंत काही संस्थांनी त्यांच्या स्मृतिदिनी कार्यक्रम सादर केले. आज मात्र त्यांच्या स्मृतिदिन असताना शहरात मात्र एकाही संस्थेने त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा कार्यक्रम आयोजित केला नाही. विदर्भ साहित्य संघालाही भटांच्या स्मृतिदिनाचा विसर पडला. सुरेश भट यांची अनेक गीते अजरामर असताना त्यांच्या गाण्याच्या मैफिलीचा एरवी शहरातील विविध सांस्कृतिक संस्थांनाही विसर पडला आहे. सुरेश भट यांचे चाहते आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनी किंवा जयंतीच्या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करीत. यंदाही त्यांनी स्मृतिदिनाऐवजी त्यांच्या जयंतीदिनी कार्यक्रम करणार असल्याचे जाहीर केले आहे. सुरेश भट हे अजब रसायन असले तरी कवितांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत बनले होते. सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेकांनी ‘व्हॉटसअॅप’वर त्यांच्या चाहत्यांनी आठवणींना उजाळा दिला असला तरी त्यांच्या स्मृतिदिन केवळ ‘व्हॉट्सअॅप’वर राहणार की काय, असेही आता वाटू लागले आहे.
महापालिकेलाही विसर
नागपूर शहराला ज्या ज्येष्ठ साहित्यकार, रंगकर्मी, सामाजिक, राजकीय आणि क्रीडाक्षेत्रातील मान्यवरांनी नावलौकिक मिळवून आहे. अशा विविध भागातील मान्यवरांच्या निवासस्थानासमोर त्यांच्या नावाचा नामफलक लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असताना महापालिकेलाही सुरेश भट यांचा विसर पडला आहे. महापालिकेच्यावतीने रेशीमबाग परिसरात सुरेश भट यांच्या नावाने सभागृहाची निर्मिती केली जात असली तरी गेल्या अनेक वर्षांंपासून त्याचेही कामही कासव गतीने सुरू आहे.