नागपूर : जोरदार पावसामुळे एकीकडे झाडवडे-डोंगरवेडे-वर्षांवेडे पारंपरिक पर्यटनस्थळांच्या वाऱ्या करू लागल्या असताना कोरडय़ा विदर्भात रेव्हपार्टीसाठी मुंबई-पुण्यासह देशभरातून मद्यवेडय़ांची जत्रा जमल्याचे नागपूरमध्ये एका फार्म हाऊसवरील कारवाईतून उघड झाले.

येथील हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरसमारी गावाजवळील प्रशस्त गिरनार फार्महाऊसजवळ रेव्ह पार्टी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकला. त्यात कर्णकर्कश संगीताच्या तालावर नशेत तरुण-तरुणी नृत्य करताना आढळले. कोटय़वधीचा खर्च करण्यात आलेल्या पार्टीवर झालेल्या कारवाईनंतर हा सारा प्रकार राजरोसपणे कसा सुरू होता, याची चर्चा मंगळवारी संपूर्ण शहरात रंगली होती.

युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सईश वारजूरकर हा चंद्रपूरचा रहिवासी आहे. त्याने ही पार्टी आयोजित केली होती. पार्टीसाठी १० दिवसांपासून समाजमाध्यमांवर जाहिरात केली जात होती. तसेच पार्टीसाठी ग्रामपंचायत, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि संबंधित विभागाची परवानगी घेण्यात आली होती. मात्र ती उशिरा रात्रीपर्यंत सुरू होती.

या पार्टीत पुणे, मुंबईसारख्या शहरातून शेकडो तर इतर भागातून अंदाजे तीन हजार तरुण-तरुणी गिरनार फार्महाऊसमध्ये आल्या होत्या. त्यांच्यासाठी सहआयोजक छगन कुवजीभाई पटेल (६५) आणि शिव वडेट्टीवार (३२) रहाटे कॉलनी यांनी महागडी विदेशी दारू आणि अन्य अंमली पदार्थाची व्यवस्था केली होती, अशीही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या पार्टीतून मोठय़ा प्रमाणात दारू, डीजे साहित्य, एलएडी असा १० लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी छगन पटेल आणि शिव वडेट्टीवर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस म्हणतात..

युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साईश वारजूरकर याने जामठा-खरसमारी गावाजवळील गिरनार फार्महाऊसमध्ये आयोजित केलेल्या ‘रेव्ह पार्टी ’ची समाजमाध्यमांवर जाहिरात करण्यात आली होती व त्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील तरुण-तरुणी नागपुरात आल्या होत्या. पार्टीत विदेशी मद्याची सोय करण्यात आली होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

पहाऱ्यासाठीही पोलीसही..

पोलिसांनी कारवाई करून ही रेव्हपार्टी उधळून लावली असली, तरी या पार्टीतील गर्दी नियंत्रण आणि सुरक्षेसाठी आधीपासून काही पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याची बाब उघड झाली आहे. आयोजकांनी कारवाई टाळण्यासाठी हिंगणा पोलिसांशी हातमिळवणी केली होती. त्यामुळेच येथील सुरक्षेची जबाबदारी काही पोलीस कर्मचाऱ्यांकडे होती.

घरी जायची पळापळ..

पोलिसांना मध्यरात्री रेव्ह पार्टीची माहिती मिळाली. छापा पडल्यानंतर पार्टीत एकच गोंधळ उडाला. तरुण-तरुणींनी दिसेल त्या मार्गाने पळ काढला. अनेकांनी विमानतळाच्या दिशेने धाव घेत पुणे-मुंबई गाठण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.