अमरावती : कष्टकऱ्याच्या कन्येची गगनभरारी, युपीएससीत कमावले यश | Pallavi Devidas Chinchkhede passed the UPSC exam amy 95 | Loksatta

अमरावती : कष्टकऱ्याच्या कन्येची गगनभरारी, युपीएससीत कमावले यश

अमरावती येथील एका रंगकाम करणाऱ्या कामगाराच्या मुलीने जिद्दीच्या बळावर केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससीच्या परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे.

अमरावती : कष्टकऱ्याच्या कन्येची गगनभरारी, युपीएससीत कमावले यश
पल्लवी देवीदास चिंचखेडे

अमरावती येथील एका रंगकाम करणाऱ्या कामगाराच्या मुलीने जिद्दीच्या बळावर केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससीच्या परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे. पल्लवी देवीदास चिंचखेडे असे या तरूणीचे नाव आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिला ६३ वे स्थान मिळाले आहे. एका गरीब कुटुंबातील मुलीने हे यश मिळवल्याचे तिचे सर्वच स्तरांतून कौतूक केले जात आहे.

हेही वाचा >>>नागपूर : भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम यांच्यावर गुन्हा

एका कष्टकरी कुटुंबातील पल्लवीने अमरावतीतच आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिला विप्रो या नामांकित कंपनीत नोकरीही मिळाली. चांगल्या पगाराच्या या नोकरीचे आकर्षण मनात न ठेवता, तिने या नोकरीचा राजीनामा देऊन युपीएससीच्या तयारीसाठी दिल्ली गाठली. पाच वर्षांचे तिचे परिश्रम फळाला आले आणि तिला युपीएससीच्या २०२१ च्या ‘सिव्हिल सर्व्हिसेस मेन’ या परीक्षेत यश मिळाले. राखीव यादीतील निकाल काल जाहीर झाले. त्यात तिला ६३ वे स्थान मिळाले.

हेही वाचा >>>चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

पल्लवीचे वडील हे रंगकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई शिवणकाम करते. पल्लवीची बहिण ही एका बँकेत कार्यरत आहे. तर भाऊ समाजकार्य महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. पल्लवी पाचव्या वर्गात असताना तिला तिच्या वडीलांनी अमरावती येथे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला संत ज्ञानेश्वर सभागृहात नेले होते. त्यावेळी मुंढे यांचे भाषण आपल्याला प्रभावित करून गेल्याचे पल्लवी हिने सांगितले. लहानपणापासूनच यूपीएससीचे स्वप्न बघायला सुरुवात केली होती. मात्र विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यात आपण एका कंपनीत नोकरी सुरू केली. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताचीच होती. युपीएससीच्या तयारीसाठी मोठी रक्कम लागणार होती, ती आपण या पगारातून जमा केली, असे पल्लवी हिने सांगितले.

पुढील काळात आपल्याला शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात काम करायला आवडेल, असे पल्लवीने सांगितले.पल्लवीने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आमच्या मेहनतीचे चीज करुन दाखविले, अशा भावना पल्लवीचे वडील देवीदास चिंचखेडे यांनी व्यक्त केल्या.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-10-2022 at 18:38 IST
Next Story
नागपूर : सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणाविरुद्ध आमचे आंदोलन अटळच ; अ.भा. मजदूर संघाचे महामंत्री रवींद्र हिमते यांचे मत