अकोला : खग्रास चंद्रग्रहण बघण्यासाठी रविवारी रात्री जनसामान्यांत खूपच उत्सुकता व आतूरता दिसून आली. दिवसभर सूर्याने अधून-मधून दर्शन देत रात्रीचे चंद्रग्रहण चांगल्यापैकी बघता येईल, अशी आशा जागवली; परंतु जसजशी रात्र सुरू झाली तशी ढगांची गर्दी वाढत होती आणि अवकाश प्रेमींच्या उत्साहावर पाणी फिरवण्यासाठी हलक्या पावसाच्या सरी देखील पडल्या. काहीसा उत्साह मावळत असतांनाच आकाशातील विरळ पांढऱ्या ढगातून चंद्र डोकावताना दिसला. ढगांच्या लपंडावात चंद्रग्रहण अनुभवता आले. नेहमीपेक्षा सर्व सामान्य लोकांमध्ये या अनोख्या खगोलीय घटनेचे साक्षीदार होण्याचे प्रमाण वाढलेले दिसून आले, असे खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी सांगितले.
पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णतः वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीतून प्रवास झाला, तर खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण दिसते. भाद्रपद शुद्ध पौर्णिमेला रविवारी रात्री ९.५७ वाजता आपल्या डाव्या बाजूकडून चंद्रबिंब पृथ्वीच्या सावलीत येताना ग्रहण प्रारंभ झाले. यावेळी चंद्र कुंभ राशीत आणि सूर्य अगदी विरुद्ध बाजूला सिंह राशीत एकविसाव्या अंशावर होते.
रात्री ११.४१ वाजता ग्रहणामध्ये, तर मध्यरात्री १.२६ वाजता चंद्रग्रहण मुक्त झाले. या चंद्र ग्रहणाच्या नोंदी घेतांना रात्री १०.१४, १०.२५, १०.३१, १०.४६ व १०.५१ या वेळात चंद्रग्रहण दर्शन सुलभ झाल्याचे दिसून आले. निसर्गाच्या या सावल्यांच्या खेळात लोकसहभाग वाढल्याचे चित्र होते. याच कालावधीत आकाश मध्याच्या जरा पश्चिमेस गरुड तारका समूहातील श्रवण आणि स्वर मंडळ तारका समूहातील अभिजित या तारकांचे दर्शन घडून आले, असे प्रभाकर दोड म्हणाले.
आता थेट पुढील वर्षीच चंद्रग्रहण
चालू वर्षात सूर्य व चंद्र अशी प्रत्येकी दोन प्रमाणे चार ग्रहणे आले. या आधीचे १४ व २९ मार्चला झालेले चंद्र-सूर्य ग्रहण, तसेच येणाऱ्या अमावास्येला होणारे सूर्यग्रहण आपल्या भागात बघता येणार नाही. फक्त एकच आपल्या भागात रविवारी खंडग्रास चंद्रग्रहण बघता आले. यावर्षीचे हे शेवटचे चंद्रग्रहण होते. आता खग्रास चंद्रग्रहण पुढील वर्षी ३ मार्च २०२६ होणार आहे. या शिवाय आकाशातील विविध प्रकारच्या घडामोडी बघण्यासाठी कायम सज्ज राहण्याचे आवाहन विश्वभारतीचे प्रभाकर दोड यांनी केले आहे.