नागपूर : रुग्णालयांना परवानगी देताना तेथे अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करणे बंधनकारक आहे. तरीही रुग्णाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. नागपुरातील ४९५ खाजगी रुग्णालयांपैकी तब्बल ११९ रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

उन्हाळ्यात नागपुरात आगीच्या घटनांमध्ये वाढ होते, याला खासगी रुग्णालये अपवाद ठरत नाही. तीन दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एका चाईल्ड केअर रुग्णालयाला आग लागली होती व त्यात काही बालके दगावली होती. नागपूरमध्येही धंतोलीसारख्या वर्दळीच्या भागातील शुअरटेक रुग्णालयाला आग लागली होती. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी ४५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. अनेक रुग्णांना धुरामुळे त्रास झाला होता. त्यामुळे शहरातील खाजगी रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा – “शरद पवार हाजीर हो,” खामगाव तहसीलदारांची नोटीस; मात्र…

धंतोलीतील घटनेनंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने खाजगी रुग्णालयाची तपासणी सुरू केली आहे. शहरात ४९५ खासगी रुगणालये असून त्यापैकी ११९ रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे उघड झाले. केवळ ८७ रुग्णालयात ही यंत्रणा असून त्यांना विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शहरात मागील काही दिवसात खासगी रुग्णालयांची संख्या वाढली. बहुमजली इमारतींमध्ये रुग्णालयांसोबत इतरही व्यावसायिक प्रतिष्ठाने असतात. अनेक इमारतीत केवळ यंत्रणा लावली जाते. पण ती कार्यन्वित नसल्याचे उघडकीस आली आहे. धंतोली, रामदासपेठ, सक्करदरा आणि प्रतापनगर हा भाग मेडिकल हब म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. केवळ धंतोली आणि रामदासपेठ भागात शेकडो खासगी रुग्णालये आहेत. तेथे नियमांचे पालन होताना दिसत नाही.

यंत्रणेसाठी नियम काय आहेत?

इमारतीच्या वापरानुसार अग्निशमन यंत्रणा उभारण्यासंबंधी नियम व अटी आहेत. आपत्कालीन स्थितीत रुग्णांना कमीत कमी वेळेत इमारतीतून बाहेर काढता यावे यासाठी विशेष उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे. रुग्णालयासाठी इमारत उभारताना त्यासंबंधी अग्निशमन विभागाकडून रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे. इमारतींची उंची १५ मीटरपेक्षा अधिक व रुग्णालय ५० खाटांचे असेल तर तेथे ‘ऑटोमॅटिक हिट डिटेक्टर’ हॉजव्हील, फायर अलार्म सिस्टीम, वेटराईजर, भूमिगत पाण्याची टाकी असणे आवश्यक आहे. इमारत बांधकाम आराखड्याला मंजुरी घेताना अग्निशामक विभागाच्या अटींची पूर्तता करायची असते. अनेकदा टप्प्याटप्प्याने या अटी पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन संबंधित रुग्णालयांकडून दिले जाते. परंतु, एकदा इमारत पूर्ण झाली की त्याकडे दुर्लक्ष केले जाते. या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रसंगी रुग्णांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता असते.

हेही वाचा – स्मार्ट मीटरविरोधात लोकलढा! नागपुरात विविध संघटना, राजकीय पक्षांचा निर्धार

“ज्या इमारतीमध्ये अग्निशमन नियंत्रण यंत्रणा नाही, अशा इमारतींना नोटीस देणे सुरू आहे. शिवाय ज्या रुग्णालयाने परिपूर्णता प्रमाणपत्र घेतलेले नाही अशांची चौकशी केली जात आहे. १५८ खाजगी रुग्णालयांची तपासणी करायची असून येणाऱ्या काळात त्या ठिकाणी यंत्रणा सक्षम व कार्यान्वित नसेल तर कारवाई केली जाईल.” – बी.पी. चंदनखेडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका