नागपूर : आईच्या काही निर्णयांना मुलीने विरोध करीत आईशी अबोला धरला. जवळपास दोन वर्षांपर्यंत आईने अबोला सहन केला. मात्र, शेवटी तिने भरोसा सेलमध्ये धाव घेतली. पोलिसांनी मायलेकींच्या हृदयाच्या कप्प्यात निर्माण झालेली वादाची पोकळी प्रेमाने फुंकर मारुन भरुन काढली. मायलेकींचे पुन्हा मनोमिलन झाले आणि त्या वृद्ध आईने भरोसा सेलमध्ये येऊन पोलिसांसह सर्व उपस्थितींना पेढा भरवित आनंद व्यक्त केला. पोलिसांच्या प्रयत्नामुळे पुन्हा एका आईच्या जीवनात आनंद पेरल्या गेला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोनाली (बदललेले नाव) या लग्नानंतर पतीला व्यवसायात मदत करीत होत्या. त्यांनी गोंडस मुलीला (स्विटी) जन्म दिला. मुलगी सहा महिन्यांची असताना पतीचा अपघातात मृत्यू झाला. त्यावेळी सोनाली या केवळ 23 वर्षांच्या होत्या. आईवडिल आणि नातेवाईकांनी दुसरा संसार थाटण्यासाठी सोनालीची समजूत घातली. मुलगी लग्न झाल्यावर पतीच्या घरी जाईल आणि आई म्हणून एकाकी जीवन जगावे लागेल, असे विचार मांडण्यात आले. मात्र, सोनाली यांनी मुलीच्या भविष्याचा विचार केला आणि दुसऱ्या लग्नास नकार दिला. पतीचा व्यवसाय आणि मुलींचा सांभाळ त्या करायला लागल्या. व्यवसायाकडे लक्ष देता यावे यासाठी त्यांनी स्विटीला सांभाळण्यासाठी एक महिला घरी ठेवली. त्यानंतर सोनाली यांनी घरीच शिक्षिका नियुक्त केली. दहावीपर्यंत तिला शाळेत ने-आण करायला चालक आणि कारची सोय केली. नंतर एमबीए करण्यासाठी स्विटी गुजरातला गेली. मुलीने नोकरी न करता आईला व्यवसायात मदत करावी, अशी सोनालीची इच्छा होती. त्यामुळे स्विटीने आईच्या व्यवसायात हातभार लावला. आईच्या प्रत्येक निर्णयाचा ती आदर करीत होती. मात्र, आईचा प्रत्येक निर्णय मान्य करावा लागतो किंवा लहानपणापासूनच आईने माझ्यावर प्रेम न करता व्यवसायाला महत्व दिल्याची सल मुलीच्या मनात बोचत होती.

हेही वाचा…अकोला : सावधान! ४.८१ लाख वाहनांवर तब्बल २३.७८ कोटी थकीत, फौजदारी कारवाई…

प्रियकरामुळे मायलेकीत ताटातूट

स्विटी ३३ वर्षांची झाली आणि तिच्या जीवनात एक युवक आला. दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिने आईशी चर्चा केली. मात्र, आईने प्रेमविवाह करण्यास तिला नकार दिला. आईचा निर्णय मुलीला रुचला नाही. तिने आईशी वाद घातला. परंतु, तिने लग्नास विरोध दर्शविला. तेव्हापासून मायलेकीत दुरावा निर्माण झाला. दोघेही मायलेकी एकाच घरात राहून एकमेकींशी बोलत नव्हत्या. दोन वर्षे हा प्रकार सुरु होता. यादरम्यान, एकमेकींशी अनेकदा वादही झाले.

हेही वाचा…गोंदिया : प्रफुल्ल पटेलांच्या गृहजिल्ह्यातून मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार?

सोडवला नाजूक नात्यातील गुंता

वृद्ध सोनाली या भरोसा सेलमध्ये आल्या आणि त्यांनी पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे यांची भेट घेतली. सोनाली यांनी मुलीने अबोला धरल्यामुळे मानसिकरित्या खचल्याची भावना व्यक्त केली. समूपदेशिका अनिता गजभीये आणि रोशनी बोरकर यांनी बाजू ऐकून घेतली. पोलिसांनी स्विटीलाही भरोसा सेलमध्ये बोलावले. दोघींची बाजू ऐकून घेतली. त्यांचे समूपदेशन केले. आईने युवा अवस्थेपासून मुलीसाठी केलेला त्याग आणि जबाबदारीची जाणिव करुन दिली. त्यानंतर दोघेही मायलेकी एकमेकींच्या गळ्यात पडून रडायला लागल्या. या प्रसंगामुळे वातावरण गंभीर झाले आणि पोलिसांच्याही डोळ्याच्या कडा पानावल्या. त्यानंतर एकाच कारमधून दोघीही निघून गेल्या. अचानक एका महिन्यानंतर सोनाली या भरोसा सेलमध्ये आल्या. त्यांनी पेढ्यांचे डबे आणले आणि पोलिसांसह उपस्थित सर्वांना त्यांनी पेढे भरवले. पोलिसांचे आभार मानून निघून गेल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police ended controversy between mother and daughter both were reunited adk 83 sud 02