नागपूर : स्वच्छ सर्वेक्षणात शहर माघारल्यानंतर स्वच्छ व सुंदर नागपूरसाठी गेल्या पाच-सहा दिवसांपासून महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाकडून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करत दंड आकारला जात आहे मात्र कारवाई करू नये यासाठी विविध राजकीय पक्षातील माजी नगरसेवकांचा अधिकारी व पथकावर दबाव वाढत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> २०२४-२५ पर्यंत औष्णिक प्रकल्पासाठी कोळशाची आयात बंद ; केंद्रीय कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

स्वच्छ सर्वेक्षणानंतर महापालिका प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यासाठी प्रत्येक झोनमध्ये दहा-दहा पथक नियुक्त केले असून त्यांनी गेल्या पाच दिवसांपासून कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र या कारवाई दरम्यान कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काही माजी नगरसेवकांकडून दबाव आणला जात आहे. महापालिकेतील एका माजी नगरसेविकेने आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्यांला फोन करून माझ्या प्रभागात पथक पाठवू नका, अशी धमकी दिल्याचे कळते.

हेही वाचा >>>वाईट उद्देशाने लोकप्रतिनिधी कामे बंद पाडतात – मिनकॉन परिषदेत गडकरींनी सुनावले

निकालस मंदिर परिसरात एका इमारतीसमोर बांधकाम साहित्य पडले असताना तेथील या परिसरातील माजी नगरसेवकाने पथकाला कारवाई कराल बघा, अशी धमकी देत महापालिकेतील एका अधिकाऱ्याला फोन केला.

राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक विरोध करत असतील तर कशी कारवाई करावी असा सवाल उपद्रवी शोध पथकाकडून उपस्थित करण्यात आला आहे. या संदर्भात पथकाने गुरुवारी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली. गेल्या पाच दिवसात ९०० लोकांवर कारवाई करण्यात आली असून ३ लाखाच्या जवळपास दंड वसूल करण्यात आला आहे. पाचशेच्या जवळपास लोकांना राजकीय दबावामुळे कारवाई न करता सोडण्यात आल्याचे पथकातील एका कर्मचाऱ्याने सांगितले.

शहरातील स्वच्छतेबाबत कडक धोरण न राबवल्यास नागरिक ऐकत नाही. कारवाई करून दंड वसूल करणे हा महापालिका प्रशासनाचा उद्देश नाही. मात्र लोक ऐकत नसतील तर कारवाई करावी लागेल. पथकावर दबाव आणला जात असेल तर संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील.

– राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political leaders bringing pressure on nagpur municipal team to stop action against rules violators zws