गर्भवतींना हिरडय़ांचा आजार असल्यास व कुटुंबीयांचे दुर्लक्ष झाल्यास होणाऱ्या मुलांवर गंभीर परिणाम संभवतात. नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात झालेल्या संशोधनात या महिलांची प्रसुती मुदतीपूर्व होणे, बाळाचे वजन कमी राहणे यासह बाळांच्या जगण्याचे प्रमाणही कमी राहण्याचा धोका असल्याचे निदर्शनात आले आहे. या अभ्यासातून प्रत्येक गर्भवतींनी दातांची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
[jwplayer 9AX3hgPE]
पोटातील बाळाला महिलेपासूनच विविध पोषक द्रव्ये मिळतात. या काळात बहुतांश कुटुंबीयांकडून या महिलांच्या खान-पानाकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यांना सुखा मेवासह विविध महत्त्वाचे पोषक घटक असलेले खाद्य नित्याने दिले जातात. या सगळ्या प्रकारामुळे या काळात महिलांचे वजन वाढते. या सगळ्या प्रक्रियेमुळे या काळात महिलांमध्ये अचानक होणाऱ्या संप्रेरक (हार्मोन्स) बदलांमुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. या सगळ्यांचा महिलेवर होणाऱ्या परिणामाचा पोटातील बाळावरही परिणाम संभावतो. तेव्हा या काळात गर्भवतींच्या दातांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
आजारांमध्ये हिरडय़ांना सूज येणे, हिरडे लालसर होणे, हिरडय़ांवर ‘प्रेग्नेन्सी टय़ूमर’ येणे यासह इतरही आजारांचा समावेश आहे. काही प्रकरणांत हिरडय़ांतून रक्तही जाते. या आजाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास महिलांना पायरीयासह इतरही गंभीर हिरडय़ांचे आजार संभावतात. आजारामुळे महिलांच्या हिरडय़ातून पांढरा द्रव्य (पस) निघणे, दात खिळखिळे होणे, पुरळ होणे यासह इतरही त्रास संभावतो. यावर महिलांना बहुतांश प्रकारात शस्त्रक्रियाकरूनच उपचार घेता येतो. परंतु महिला गर्भवती झाल्यावर प्रथम तीन महिने व शेवटच्या तीन महिन्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया वैद्यकीयदृष्टय़ा करता येत नाही, ती केल्यास गर्भपात, मुदतीपूर्व प्रसुती होण्याची शक्यताही नकारता येत नाही.
मुदतीपूर्वी प्रसुती झाल्यावर काही प्रकरणांत मुले मतिमंद होणे, ते अशक्त राहणे, त्यांना अपंगत्वही येण्याची शक्यता जास्त आहे. नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात १९९८- ९९ मध्ये डॉ. रमेश कोहाड व डॉ. आर. के. एल्टीवार यांनी केलेल्या अभ्यासात ही माहिती पुढे आली. हा या विषयावर मध्य भारतातील पहिलाच अभ्यास असून तो देशातही पहिला राहण्याची शक्यता दंत प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. या अभ्यासाची माहिती जगभरातील दंतच्या डॉक्टरांना मिळावी म्हणून तो आंतराष्ट्रीय जनरलमध्येही प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा विषय गंभीर असतानाही अद्याप शासकीय रुग्णालयांत यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून त्याची दखल घेण्यात आल्याचे दिसत नाही.
गर्भवतींनी दातांची विशेष काळजी न घेतल्यास त्यांच्या होणाऱ्या मुलांवर गंभीर परिणाम संभवतात. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या संशोधनात ही निदर्शनास आले असून प्रत्येक महिलांनी या काळात तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. शासकीय दंत महाविद्यालयात स्वतंत्र व्यवस्था नसली तरी या रुग्णांवर उपचाराची अद्ययावत व्यवस्था आहे.
– डॉ. वैभव कारेमोरे, शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर</strong>
‘अहमदनगर’च्या संशोधनातही ७८ टक्के महिलांमध्ये समस्या
‘अहमदनगर’ येथे या विषयावर २०१० मध्ये एक अभ्यास झाला. त्यात २,५०० प्रसुती झालेल्या मातांपैकी ७८ टक्के महिलांना हिरडय़ांचा आजार असल्याचे पुढे आले. पैकी बहुतांश महिलांना २.५० किलोहून कमी वजनाची मुले झाली.
[jwplayer zVOMyVTv]