तिरोडा तालुक्यातील जंगलव्याप्त नवेझरी गावात सध्या वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. गावाला लागून व्याघ्रप्रकल्प असल्यामुळे तेथील वन्यजीव गावाशेजारी नेहमीच येत असतात. गेल्या काही दिवसांपासून शेतशिवारात वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत असून अनेकांना वाघ दिसल्याचेही बोलले जात आहे. सध्या सर्वत्र शेतीची कामे सुरू असून शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाचे पथक गावात दाखल झाले असून गस्त वाढवण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिरोडा तालुक्याचा दक्षिण भाग जंगलव्याप्त आहे. गावाला लागूनच व्याघ्रप्रकल्प असल्याने या परिसरात नेहमी वन्यजीवांचा वावर असतो. यापूर्वी वाघ आणि बिबट्यांनी या परिसरात धुमाकूळ घातला होता. सध्या धान कापणी आणि मळणीचे काम सुरू असल्यामुळे शेतकरी शेतात असतात. गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाघाचे दर्शन होत असून रात्रीला वाघाच्या डरकाळ्यादेखील ऐकू येतात. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये कमालीची भीती दिसून येत आहे.

हेही वाचा: Nagpur University: निवडणूक मतमोजणी केंद्रावर दोन प्राचार्यांमध्ये मध्यरात्री राडा; कारण…

वाघाच्या दहशतीमुळे सायंकाळ होताच परिसरात शुकशुकाट दिसून येतो. सायंकाळी वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत असल्यामुळे गावात अघोषित संचारबंदीसदृश्य चित्र दिसून येत आहे. दरम्यान, नवेझरी परिसरात वाघ असल्याची माहिती मिळाली असून त्याआधारे वन विभागाचे पथक गावात पोहोचले आहे. वाघ केवळ रस्ता ओलांडून गेला असल्याची माहिती असून वनविभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे येथील वनपरिक्षेत्राधिकारी आर. जी. मून यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recent unannounced curfew in gondia due to tiger roar panic among the villagers tmb 01