धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध सामाजिक संघटनांकडून अन्न व भोजनदान केले जाते. या सगळ्यांनी अन्न व सुरक्षा मानके कायद्यानुसार प्रत्येक स्टॅालची नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी सांगितले.
प्रत्येक वर्षी धम्मचक्र दिनानिमित्त नागपूर जिल्ह्यात देशाच्या विविध भागातून भाविक येतात. या सगळ्यांच्या जेवणासाठी विविध सामाजिक संघटनांकडून शहरातील विविध भागात स्टॅाल लावून अन्न व भोजदानाची सोय केली जाते. दरम्यान, या स्टाॅलमधील अन्न सुरक्षित रहावे व त्यापासून कुणालाही हानी होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रत्येक संस्थेच्या स्टाॅलला अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार नोंदणी बंधनकारक केले आहे, सहाय्यक आयुक्त अ. रा. देशमुख म्हणाले, नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क प्रतिवर्ष आकारले जाते. हे नोंदणी प्रमाणपत्र घेण्यासाठी foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
स्टाॅलधारकांसाठी नियम
- अन्नपदार्थ तयार करताना उत्पादनाची जागा स्वच्छ असावी.
- कच्चा माल- अन्न परवाना धारक अथवा नोंदणीकृत व्यवसायिकांकडूनच खरेदी करावा.
- वापरण्याची भांडी स्वच्छ, सुस्थितीत व झाकण असलेली असावी.
- तयार अन्नपदार्थ मानवी सेवनास सुरक्षित राहतील याची खात्री करावी.
- अन्नपदार्थासाठी लागणारे पाणी पिण्यास योग्य असावे.
- अन्न तयार करणारा व वितरण करणारा स्वयंसेवीला त्वचारोग वा संसर्गजन्य आजार नसावा.
- नोंदणी प्रमाणपत्र स्टाॅलमध्ये दर्शनीय भागावर लावून ठेवावे.
- अन्नपदार्थासाठी लागणारा कच्चा माल, केटरिंग, अन्न बनवणारा व वितरण करणाऱ्या स्वयंसेवकांचा अभिलेख जतन करावा.
- शिळे अन्न भाविकासह कुणालाही खाण्यासाठी देऊ नये, हे अन्न वेळीच नष्ट करावे.
- तपासणी करण्यासाठी येणाऱ्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्याला सहकार्य करून त्यांच्या सूचना पाळाव्या.