नागपूर: रामजन्मभूमी आंदोलनाच्या संपर्कात आलेल्यांना मोरोपंत पिंगळे यांच्याविषयी माहिती आहे. मात्र, इतर मोठ्या, शिक्षित लोकांना मोरोपंत माहिती नाहीत. विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंगल या आंदोलनात होते हेच लोकांना माहिती आहे. मात्र, रामन्मभूमी आंदोलन आणि रथयात्रेचे नियोजनही मारोपंतांनी केले होते, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले.
आणिबाणीनंतरच्या काळात विरोधक एकत्र आले तर सरकार येऊ शकते, अशी चर्चा सुरू होती. मात्र, आमची त्यावेळीची परिस्थिती अमानत रक्कम जमा होण्याची होती. मात्र, मोरोपंत पिंगळे यांनी २७६ जागा येण्याचे भाकीत केले होते. निवडणुकांसाठी काम केले मात्र, निकालाच्या दिवशी ते कधीच श्रेय घ्यायला समोर येत नसत असेही डॉ. भागवत म्हणाले.
साप्ताहिक विवेक निर्मित आणि मंदार मोरोणे व प्रांजली काणे लिखित ‘मोरोपंत पिंगळे-द आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स’ या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आले. वनामती सभागृह झालेल्या या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक चौगुले, प्रकाश ढोका, राहुल पठारे, संतोष पिंगळे, रवींद्र गोळे उपस्थित होते. मोरोपंत पिंगळे यांचे डोंगराएवढे काम असले तरी लोकांमध्ये त्यांचा डंका वाजला नाही. तशी खडतर साधना त्यांनी लहानपणापासून केली होती. डोंगराएवढे कर्तुत्व असूनही सर्व संघासाठी इतकाच भाव त्यांच्यात होता. रामजन्मभूमी आंदोलनामध्ये अशोक सिंगल यांचे नाव लोकांना माहिती आले. कारण ते पुढे होते. नियोजनामध्ये सिंगल हे पुढे राहतील असेच ठरले होते. मोरोपंतांनाही पुढे राहता आले असते. पण, तशी योजना नव्हती. या संपूर्ण आंदोलनाचे प्रणेता तुम्ही आहात असा प्रश्न मोरोपंतांना केला असता, त्यांनी सहज श्रेय नाकारत सिंगल यांच्याकडे बोट दाखवले, असेही डॉ. भागवत म्हणाले.
रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळामध्ये पुरावे मांडण्याचे काम सुरू होते. यावेळी आपसात चर्चा सुरू असताना या जागेवर एक मंदिर होते हे ठामपणे मांडण्याचे कामही मोरोपंत करत होते, असेही सरसंघचालक म्हणाले. हिमालयासारखे कर्तुत्व संघाच्या चरणी शरण असे स्वयंसेवकाचे जीवन असले पाहिले. तोच वस्तुपाठ मारोपंत पिंगळे यांच्या पुस्तकातून घ्यावा, असे आवाहनही डॉ. भागवत यांनी केले. यावेळी पुस्तकाचे लेखक मंदार मोरोणे व प्रांजली काणे यांनीही मनोगत व्यक्त केले.