ओबीसी, आंबेडकरवादी आणि डाव्यांची एकत्र मोर्चेबांधणी; विचारसरणीपासून देशाला वाचविण्याचे आवाहन

रोहित वेमुला आणि कन्हैयाकुमार यांच्या प्रकरणानंतर आंबेडकरी विद्यार्थी संघटना तसेच वेगवेगळे आंबेडकरी गट प्रस्थापित विचारसरणीच्या विरोधात सक्रिय झाले असून, आत्मचिंतनाबरोबरोबरच धार्मिक, राजकीय, सामाजिक पातळीवर त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
भाजप सत्तेवर आल्यानंतर विविध शैक्षणिक संघटनांच्या व्यासपीठांवर भाजपप्रणीत संस्थांचे कार्यक्रम होऊ लागले. रोहित वेमुला आणि कन्हैयाकुमार प्रकरणानंतर आंबेडकरी जनतेमधील खदखदणारा असंतोष उफाळून आला असून, त्यासाठी वसंतराव देशपांडे सभागृहात प्रस्थापित विचारसरणीच्या विरोधात चर्चासत्र, परिसंवाद, गट चर्चा, मेळावे यांना उधाण आले आहे. त्यात सेवानिवृत्त न्यायाधीश, सनदी अधिकारी, वकील, डॉक्टर, अभियंते, शिक्षक, पत्रकार, कलावंत या सर्वाचाच समावेश दिसून येत आहे. शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने सर्व विद्यापीठे, सरकारी कार्यालये आणि महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, परिसंवाद, प्रदर्शने, चर्चासत्रे आयोजित केली जात आहेत. विहारांचे एकीकरण, आरक्षणावरील परिसंवाद, जाती अंताचे लढे यासारख्या परिषदा, देशद्रोह आणि राष्ट्रवादाचे परिशीलन या कार्यक्रमांची नागपुरात चलती वाढली आहे. त्यात उघडउघड राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप सरकारच्या विरोधात टीका होत असते.
धनवटे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘देशप्रेम आणि देशद्रोहाची सैद्धांतिकी’ या विषयावर बोलताना माजी न्या. कोळसे पाटील यांनी देशाला हुकूमशाही, नाझीवाद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून वाचवा असे थेट आवाहन करून आरएसएसचे पितळ उघडले पाडले. त्यानंतरच्या वकिलांचीही ‘प्रोग्रेसिव्ह लॉयर्स मीट’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात पार पडली. त्यात न्यायपालिका आणि आरक्षण धोरण, ‘देशद्रोह’ भारतीय राज्यघटनेच्या आधीची व नंतरची संकल्पना, मानवाधिकार इत्यादी विषयांवर माजी न्यायाधीश अनिल वैद्य, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, अ‍ॅड. संदेश भालेकर, अ‍ॅड. जयदेव शामकुंवर, अ‍ॅड. राजकुमारी रॉय, अ‍ॅड. छाया यादव यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून बुद्ध विहारांच्या समन्वयासाठी काम करणारे अशोक सरस्वती यांनी विहाराच्या माध्यमातून रिपब्लिकन्सला एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी झाशी राणी चौकातील हिंदी मोरभवनच्या शेजारच्या सभागृहात भव्य कार्यक्रम आयोजित करून कलावंत, कार्यकर्त्यांची दशा आणि दिशेवर मोठा कार्यक्रम त्यांनी घडवून आणला. आंबेडकरी विद्यार्थी संघटनाही याबाबतीत मागे नसून, देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये कन्हैयाकुमारला बोलावण्याची चढाओढ सुरू आहे. त्याला आपल्याही विद्यापीठात बोलवण्याची विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इच्छा आहे. मात्र, हा महिना रेल्वेची तसेच विद्यापीठाच्या परीक्षा सुरू असल्याने कन्हैयाकुमारचा नागपुरातील कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आहे.