राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आवाहन

राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालय लवकरच अंतिम निर्णय देणार आहे. यासंदर्भात जो काही निर्णय येईल तो  जनतेने  मोठय़ा मनाने स्वीकारावा व शांतता बाळगावी, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बुधवारी ट्विटरद्वारे केले.

सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणाची सुनावणी नुकतीच संपवली.  सरन्यायाधीश रंजन गोगोई येत्या १७ नोव्हेंबरला निवृत्त होणार असल्याने त्याआधी या प्रकरणाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाजमाध्यमाद्वारे राम मंदिर प्रकरणी न्यायालयाचा निर्णय काहीही आला तरी जनतेने त्याचा स्वीकार करावा, निर्णयानंतर देशात सौहार्दपूर्ण वातावरण ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे आवाहन केले. यासंदर्भात संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी पत्रक काढलेआहे.

त्यानुसार संघाने प्रचारक वर्गाची दोन दिवसीय बैठक हरिद्वार येथे आयोजित केली आहे. आता ही बैठक हरिद्वार ऐवजी दिल्लीला होणार आहे. या बैठकीमध्ये याबाबत चर्चा केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातही असेच आवाहन केले होते.