नागपूर : डिलेश्वरी विलास ग्वालवंशी… रा. काटी (जिल्हा गोंदिया) येथील मुलगी… वाणिज्य शाखेतून बारावीत ८६.३३ टक्के गुण घेत केंद्रातून प्रथम आली. तिची आई पूर्णत: वेडसर तर वडिलांना दारुचे व्यसन. त्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष. अडचणीतील, निराधार गरीब मुली, महिलांच्या मदतीसाठी तत्पर असलेल्या सविता बेदरकर यांनी डिलेश्वरीसाठी मदतीचा हात पुढे केला.

डिलेश्वरी बाबत सविता बेदरकर यांनी त्यांच्या फेसबूक अकांऊटवर तिच्या जीवनाविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार त्या म्हणतात “ डिलेश्वरी दहावीत असताना तिच्या शाळेतील शिक्षकांनी तिच्याबाबत माहिती दिली. तिला जमेल तशी आणि शक्य तेवढी मदत करत तिचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावला. डिलेश्वरीच्या घरी वीज नाही. गावातील पथदिव्याच्या खाली अभ्यास करीत तिने दहावीत ८६ टक्के गुण मिळविले. बारावीही ८६.३३ टक्के गुण मिळवत प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाली. दारुड्या वडिलांकडून तिला मारहाण व्हायची. तिच्यासाठी तो जीवघेणा ठरत होता.

रोज रोज मरण्यापेक्षा एकदा मेलेले बरे हा विचार करून तिने तीन वर्षांपूर्वी रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न केला. कोण्यातरी भल्या माणसाने तिचा जीव वाचविला. विचारपूस करून तिच्या घरी पोहचवून दिले. कारण तिचा मृत्यू कदाचित नियतीला मंजूर नव्हता. तिची कहाणी ऐकून मन सुन्न झाले.या लेकीला घडविण्याचा निर्धार केला अन्‌ सावित्रीच्या या लेकीचा शिक्षणाचा पुढील प्रवास सुरू झाला. आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू झाला.

विपरीत परिस्थितीत तिनं बारावीत मिळविलेलं यश नेत्रदीपक आहे. आज ती वाणिज्य शाखेतून पदवी शिक्षण घेत आहे. तिची लहान बहीण जीएनएम अभ्यासक्रमाला आहे. तिला गरज असलेल्या मदतीने कदाचित तिचं पुढचं आयुष्य सावरेल. शिक्षणानं कदाचित ती उद्या मोठ्या हुद्यावर जाईल. योग्य मार्गदर्शन आणि थोड्याशा मदतीनं जीवन कसं बदलून जाते याचं जिवंत उदाहरण म्हणजेच डिलेश्वरी ग्वालवंशी, आहे,असे सविता बेदरकर म्हणतात. मी केवळ माध्यम आहे. समाजातील अशा होतकरू विद्यार्थ्यांसाठी देणारे हात समोर येतात. या मदतीत सहयोग मल्टिनॅशनल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, तृतीयपंथी निशा, छैलबिहारी अग्रवाल यांनीही मोलाचे सहकार्य केले, असे बेदरकर नमुद करतात.