वर्धा : शमी वृक्षाचे महात्म्य पौराणिक काळापासून चालत आले आहे. दसरा आला की शमीची हमखास आठवण होते. पण प्रतिकात्मक म्हणून आपट्याची पाने देत सोनं लुटल्या जाण्याची परंपरा पडली आहे. कारण या दिवशी पांडवांनी वनवासात असतांना त्यांची अस्त्रे याच झाडाच्या ढोलीत लपवून ठेवली असल्याचे पुराण सांगते.
वर्षभराच्या अज्ञातवासानंतर ते जेव्हा परत आले तो दिवस विजयादशमीचा म्हणजेच दसऱ्याचा. म्हणून या दिवशी शमी वृक्षाचे पूजन करीत सिमोलंघन केल्या जाते व आपट्याची पाने वाटल्या जातात. पुराणानुसार प्रभू श्रीराम यांनी लंकेवर स्वारी करण्यापूर्वी शमी या वनास्पतीची पूजा करीत कूच केले होते. शमी गणेशाची आवडती. शमी म्हणजे शमण करणारी. दृष्ट कृत्यांचा नाश करणारी. शमी शमयते पापम, म्हणजे मंगलाचा नाश करणारी म्हणून शमी पूजनीय.
पण हाच पवित्र वृक्ष बेसुमार तोड झाल्याने महाराष्ट्रात दुर्मिळ होत चालला आहे. त्याची पाने बाभळी सारखी बारीक व नाजूक असतात. त्याला लागणाऱ्या शेंगाची भाजी केल्या जाते. हरियाणा, गुजरात येथे या झाडास खेजडी तर महाराष्ट्रात सौंदड म्हणूनही ओळखल्या जाते. त्याचे जतन करण्याची गरज आहे. या शमी वृक्षावर अतोनात प्रेम करणाऱ्यांनी त्याचे जतन करण्यासाठी जीवाची बाजी लावल्याचा दाखला आहे. किंबहुना प्राणांची आहुती दिल्याचा इतिहास आहे.
राजस्थानमध्ये बिष्णोई समाजाने ही वनस्पती प्राण पणाला लावून जगविली आहे. इतिहासात तसा संदर्भ आहे. १७३० साली जोधपूरचे तत्कालीन महाराज अभयसिंहजी यांनी राजवाडा बांधण्यासाठी खेजरली गावातून झाडे तोडून आणण्याचे फर्मान सोडले. सैनिक झाडे तोडण्यासाठी या गावात गेले. झाडे तोडू नये म्हणून बिष्णोई समाजातील महिला पूरुषांनी खेजडी म्हणजेच शमीच्या झाडाला मिठ्याच मारल्या. म्हणून मग सैनिकांनी झाडासोबतच ३६३ स्रिपुरुषांची कत्तल केली.
हे कळताच राजाने झाडे तोडण्याचे फर्मान रद्द केले. वृक्ष संरक्षणार्थ ३६३ बिष्णोई धारातीर्थी पडले. त्या जागेवर बांधलेले अमृताबाई स्मारक पर्यावरण प्रेमीसाठी आजही स्फूर्तीदायी आहे. आजही या खेजरली गावात २०० वर्षापेक्षा अधिक जुने शमी वृक्ष पाहायला मिळतात. बिष्णोई समाजाने काळविट सोबतच शमीचे प्राणपणाने जतन केले आहे.
निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे म्हणतात शमी वनस्पती दुर्मिळ होत चालल्याने आमच्या ऑक्सिजन पार्कमध्ये त्याची भरपूर लागवड केली आहे. तसेच नागरिकांना त्याची रोपे मोफत दिल्या जातात. ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. नेहमी हिरवीगार असते. मुळात गाठी असल्याने जमिनीत नत्र साठविण्याची त्यात क्षमता असते. जनवारांसाठी शमी उत्तम चारा आहे. म्हणून तोड थांबली पाहिजे. अन्यथा पुढील पिढीस पौराणिक संदर्भ वाचायला मिळतील पण शमीचे झाड मात्र दिसणार नाही.