नागपूर : मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी शहरात दलालांचे मोठे रॅकेट सक्रिय झाले आहे. या रॅकेटने आतापर्यंत हजारो मुलांना बोगस कागदपत्राद्वारे आरटीई अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिल्याची माहिती समोर आली आहे. सीताबर्डी पोलिसांनी १७ पालकांवर गुन्हे दाखल केल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

राज्य शासनाने आरटीई अंतर्गत शाळांमध्ये २५ टक्के कोटा एससी, एसटी यांच्यासह आर्थिक कमकुवत गटातील पाल्यांना राखिव ठेवण्यात येतो. त्यासाठी शिक्षण विभागाकडून पहिल्या ते आठव्या वर्गासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. खासगी शाळांमध्ये २५ टक्के कोट्यातून प्रवेश मिळविण्यासाठी अनेक पालक धडपड करीत असतात. गेल्या काही वर्षांपासून आरटीईमध्ये पाल्यांचा समावेश होऊन खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी मोठे रॅकेट सक्रिय झाले आहे. हे रॅकेट आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी पालकांकडून मोठी रक्कम घेतात. त्यासाठी पालकांना शाळेच्या तीन किलोमीटर अंतर नसल्यास शाळेच्या अगदी बाजूला भाड्याने राहत असल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून देतात. तसेच मुलांच्या जन्मतारखांमध्ये बदल करून देतात. एवढेच नव्हे तर आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वडिलांचे आधार कार्ड, आर्थिकदृष्ट्या असक्षम असल्याचे प्रमाणपत्र आणि बनावट जातीचा दाखलासुद्धा काढून देतात.

हेही वाचा – अकोला : अपघाताच्या मालिकेनंतर परिवहन व पोलीस विभागाला जाग, समुपदेशनसह कारवाई…

या सर्व बोगस कागदपत्रांच्या आधारे पात्र नसतानाही पाल्यांना आरटीई अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात येतो. अशा बोगस विद्यार्थ्यांमुळे आरटीईसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. शिक्षण विभागाचे अधिकारी रमेश गंगाधर हरडे (मानेवाडा रिंग रोड) यांनी सीताबर्डीत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी १७ पालकांवर गुन्हे दाखल केले. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. आरोपी पालकांची धरपकड सुरु असून त्यांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आल्याची माहिती सीताबर्डीचे ठाणेदार आसाराम चोरमोले यांनी दिली.

शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश?

आरटीई प्रवेश मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीशी शिक्षण विभागातील कुणी अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा टोळीत समावेश आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावाची चर्चा सुरु असून त्यांचीही चौकशी सीताबर्डी पोलीस करणार आहेत.

हेही वाचा – यवतमाळ : संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना कक्षात डांबले, काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

पैसे घेणाऱ्या दलालांची पळापळ

आरटीई अंतर्गत नामवंत शाळांमध्ये पाल्यांना हमखास प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली दलाल दीड ते दोन लाख रुपये पालकांकडून घेत होते. अर्धे पैसे प्रवेश प्रक्रिया सुरु असताना आणि अर्धे पैसे शाळेत प्रवेश मिळल्यानंतर घेण्यात येत होते, अशी चर्चा आहे. रशिद नावाचा दलाल या टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल होताच दलालांनी अटक होण्याच्या भीतीने शहरातून पळ काढला आहे.