नागपूर : सध्याच्या काळात कामावर किंवा घरी पोहचण्यासाठी सगळ्यांना अतिघाई असते. त्यामुळे वेगाने वाहने चालवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षभरात ६४ हजार वाहनचालकांनी सिग्नल तोडला तर २२ हजार वाहनचालकांनी वेगमर्यादेचे उल्लंघन केले. या अतिघाईमुळेच वर्षभरात ३४५ जण अपघातात ठार झाले असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेगाशी स्पर्धा करीत वाहन चालवणाऱ्यांचे प्रमाण शहरात वाढत आहेत. बुलेट किंवा ‘स्पोर्ट्स बाईक्स’ चालवणारे तर ‘सिग्नल’ची पर्वा न करता वाहने चालवतात. अनेक जण वेळेपूर्वी घरून न निघता केवळ उशीर होत असल्यामुळे ‘सिग्नल’ तोडून नियमांचे उल्लंघन करतात. प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस नसतात. त्यामुळे ‘सिग्नल’ यंत्रणेवरून वाहतूक नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न वाहतूक पोलीस करीत असतात. मात्र, अतिवेगाने वाहने चालवणाऱ्यांवर अद्यापपर्यंत अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश आले नाही. चौकात पोलीस कर्मचारी उपस्थित असतानाही दुचाकीचालक बिनधास्त ‘रेड सिग्नल जम्पिंग’ करतात. वाहतुकीचा नियमभंग करणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून ई-चालान पाठवण्यात येते. वाहतूक पोलिसांच्या या सर्व प्रयत्नानंतरही ‘रेड सिग्नल’ तोडणारे आणि वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियंत्रण नाही. रस्ते अपघातासाठी हे दोन्ही प्रमुख कारणे असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

२०२४ मध्ये २२ हजार २४६ वाहनचालकांनी वेगमर्यादेचे उल्लंघन केले आहे. तर ६४ हजार ५१४ वाहनचालकांनी सिग्नल जम्पींग केले आहे. या सर्वांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली असली तरी ‘हम नही सुधरेंगे’ असा प्रकार वाहनचालक करीत आहे.

‘डिलिव्हरी बॉय’ला वाहतूक नियमांतून सूट?

खाद्यपदार्थ, किराणा आणि भाजीपाला इत्यादी सामानांची १० मिनिटांत ‘डिलिव्हरी’ देण्याचा विश्वास दाखवणाऱ्या कंपन्यांचे ‘डिलिव्हरी बॉय’ यांच्याकडून सर्वाधिक वेळा ‘सिग्नल जम्पिंग’ होते. शहरातील प्रत्येक सिग्नलवर ‘डिलिव्हरी बॉय’ वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करीत सुसाट निघून जाताना दिसतात. त्यामुळे ‘डिलिव्हरी बॉय’ला वाहतूक नियमांतून सूट आहे का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

वर्षनिहाय स्थिती

नियम उल्लंघन – २०२४ २०२३

वेगमर्यादा कारवाई – २२२४६ २१०९६

सिग्नल तोडणे – ६४५१४ ६२३५६

स्टॉप लाईन – १९४२५ ११६२९

प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस ठेवणे शक्य नाही. सीसीटीव्हीच्या माध्यमातून ई-चालान कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक पोलीससुद्धा नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करीत आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. – अनिरुद्ध पुरी, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speed limit signal violation accident nagpur ask 83 ssb