नागपूर: आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील विविध भागासह नागपूरातूनही मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात. प्रवाशांची संख्या बघता खासगी ट्रॅव्हल्सकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते. ही लुट थांबवण्यासाठी एसटी महामंडळाने नागपूरहून बसेसबाबत केलेल्या नियोजनाबाबत आपण जाणून घेऊ या.

पंढरपूरला  आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक येतात. अनेक प्रवाशी स्वतःच्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखीं बरोबर चालत  येतात. या प्रवाशांना एसटीने यंदा  थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करुन दिली आहे. भाविकांसाठी एसटीने २ जुलै २०२५ ते दि.१३ जुलै २०२५ दरम्यान यात्राकाळात ६५ विशेष यात्रा बस नागपूरहून सोडण्याचे नियोजन केले आहे. परंतु मागणी आल्यास आणखी बस उपलब्ध करण्याची एसटीची तयारी आहे. यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्याहून जास्त भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी तेथूनच बस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यासाठी भविकांनी जवळच्या आगारात संपर्क करायचा आहे.

या योजनांची सवलत लागू राहणार…

पंढरपूर यात्रे दरम्यानही प्रवाश्यांना शासनाने लागू केलेली सवलत लागू राहणार आहे. त्यानुसार ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास, ६५ ते ७५ वर्षाखालील ज्येष्ठांसह महिलांना ५० टक्के सवलत लागू राहणार असल्याचेही महामंडळाने कळवले आहे.

नागपुरातील या आगारातून बसेस

एसटी महामंडळाने नागपूर विभागातील विविध आगारातून पंढरपूरला जाण्यासाठी २ जुलै ते १३ जुलै दरम्यान ६५ बसेसचे नियोजन केले आहे. त्यानुसार नागपुरातील घाटरोड आगारातून १३ बसेस, गणेशपेठमधून १३ बसेस, उमरेडवरून ५ बसेस, काटोलमधून ७ बसेस, रामटेकमधून ७ बसेस, सावनेरमधून ७ बसेस, इमामवाडातून ६ बसेस, वर्धमाननगरहून ७ बसेसचे नियोजन केल्याची माहिती आहे. वर्ष २०२४ मधील आषाढी यात्रेसाठी ५० बसेसचे नियोजन होते. यंदा बसेसची संख्या वाढवून ६५ करण्यात आली आहे.

पंढरपुरला चार तात्पूरती बस स्थानके उभारणार

वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गदर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरतो बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शक फलक अशा विविध सोयी सुविधा पुरविण्यात येणार असल्याचेही महामंडळाने कळवले आहे.