नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) नुकतीच प्रवासी भाड्यात सुमारे १५ टक्के दरवाढ केल्याने प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच आता ‘आवडेल तेथे प्रवास’ पासचे दरही ४५ ते ६६ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहेत.एसटी बसमध्ये सातत्याने प्रवास करणाऱ्यांसाठी महामंडळाने ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना आणली. त्याअंतर्गत पास घेऊन चार दिवस आणि सात दिवस राज्यात कुठेही फिरता येते. एसटीच्या साध्या बसेसमध्ये पूर्वी ४ दिवसांच्या पाससाठी प्रौढांना १,१७० रुपये तर ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना ५८५ रुपये लागत होते. ३१ जानेवारीपासून होणाऱ्या दरवाढीनंतर हे दर ५५ टक्यांनी वाढून प्रौढांना १,८१४ रुपये आणि मुलांना ९१० रुपये मोजावे लागतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सात दिवसांसाठीच्या पाससाठी पूर्वी प्रौढांना २,०४० आणि मुलांसाठी १,०२५ रुपये आकारले जात होते. दरवाढीनंतर आता प्रौढांना ३,१७१ रुपये आणि मुलांना १,५८८ रुपये मोजावे लागतील. शिवशाही बसमध्ये या योजनेअंतर्गत चार दिवसांच्या प्रवासासाठी प्रौढांकडून पूर्वी १,५२० रुपये तर मुलांसाठी ७६५ रुपये आकारले जात होते. दरवाढीनंतर प्रौढांसाठी २,५३३ रुपये, मुलांकडून १,२६९ रुपये आकारले जातील. ही दरवाढ ६६ टक्के आहे. शिवशाहीत सात दिवसांसाठी पूर्वी प्रौढांना ३,०३० रुपये, मुलांकडून १,५२० रुपये आकारले जात होते. आता दरवाढीनंतर प्रौढांकडून ३,०३० रुपये तर मुलांकडून १,५२० रुपये आकारले जाईल. ई- बस नवीन आहे. या बसमध्ये चार दिवसांच्या पाससाठी प्रौढांकडून २,८६१ रुपये तर मुलांसाठी १,४३३ रुपये आकारले जाणार आहेत. सात दिवसांसाठी प्रौढांकडून ५,००३ रुपये तर मुलांसाठी २,५०४ रुपये आकारले जातील. या दरवाढीमुळे प्रवासी कमी होण्याचा धोका एसटी कर्मचारी संघटनांकडून वर्तवला जात आहे.

दुर्गम व आदिवासी पाड्यांपर्यंत एसटीची सेवा

चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्वसामान्य प्रवाश्यांच्या सार्वजनिक प्रवासी नागरिकांच्या प्रवासाचे प्रमुख साधन म्हणून एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवेकडे बघितल्या जाते. एसटीच्या बसेस सामाजिक बांधिलकी म्हणून राज्यातील दुर्गम व आदिवासी पाड्यापर्यंत सेवा देत असतात. “एसटीच्या आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेत भाडेवाढीचा अतिरेक नको. त्यात प्रवाशांचाही विचार व्हायला हवा. आताच्या दरवाढीने एसटीचे प्रवासी कमी होण्याचा धोका आहे.” अजय हट्टेवार, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St hiked passenger fares by around 15 percent now avdel tethe pravas pass fares also increased from 45 to 66 percent mnb 82 sud 02