|| महेश बोकडे

वर्षभऱ्यापासून दोन वाहने पडून

नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) गेल्यावर्षी नागपूर शहराला मिळालेल्या दोन नवीन मोबाईल दुरुस्ती व्हॅन वापर न होताच पडून आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या महामंडळाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सार्वजनिक प्रवासी वाहतूक करताना रस्त्यांवर एसटीच्या बसेस एअर लॉक, टायर पंक्चर, स्टेरिंग लॉकसह नादुरुस्त होऊन बंद पडल्यास तातडीने दुरुस्तीसाठी महामंडळाने प्रत्येक विभाग नियंत्रक कार्यालयांना गेल्यावर्षी नवीन मोबाईल दुरुस्ती व्हॅन गरजेनुसार संख्येने उपलब्ध करून दिल्या होत्या. प्रत्येक बसची किंमत २५ ते ३० लाख रुपये आहे.

या बसमध्ये दुरुस्तीसाठी आवश्यक सगळे यंत्र व साहित्य उपलब्ध आहे. परंतु त्यासाठी पाच तांत्रिक कर्मचारी आवश्यक असतानाही ते उपलब्ध केले गेले नाही. त्यामुळे राज्याच्या काही भागांसह नागपूरला मिळालेल्या दोन मोबाईल दुरुस्ती व्हॅन वापर न होताच पडून आहेत. नागपूरच्या गणेशपेठ आणि घाटरोड आगारात सध्या हे वाहन ठेवले असून त्याला रोज स्वच्छ करून ठेवण्यापलीकडे काहीही केले जात नाही. एकीकडे एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असताना त्यातील कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेली वेतनवाढ मिळत नाही. दुसरीकडे गरज नसताना असल्या पद्धतीचे वाहन खरेदी करून ते वापर न करता भंगार केले जात असल्याने एसटीच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

महिन्याला ३० ते ४० बस नादुरुस्त

नागपुरात प्रत्येक महिन्याला ३० ते ४०  बसेस नादुरुस्त होतात. त्या दुरुस्त करण्यासाठी या दुरुस्ती व्हॅन पाठवल्याच जात नसल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु निम्म्या ठिकाणी ही व्हॅन पाठवत असल्याचा दावा विभाग करीत आहे.

‘‘गणेशपेठ आगारातील मोबाईल दुरुस्ती व्हॅन गरजेनुसार वापरली जाते. जास्तच समस्या असलेल्या बस कार्यशाळेत आणून दुरुस्त केल्या जातात. या वाहनाचा वापर पुढे आणखी वाढवला जाणार आहे.’’ – अनिल आमनेरकर, आगार व्यवस्थापक.