नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे वाघांची खाण. या व्याघ्रप्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांना तो कधीच निराश करत नाही. मात्र, त्याला भेटण्यासाठी जाऊ न शकणाऱ्या पर्यटकांना देखील तो निराश करत नाही. कारण, या व्याघ्रप्रकल्पातील वाघांचे नवनवे विडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे, ज्यात भर पावसात उभ्या असलेल्या वाघाच्या डोळ्यासमोरून हरणांचा कळप जातो, पण त्यातली एकही शिकार त्याच्या तावडीत सापडत नाही.
हतबल झालेला वाघ मग भर पावसात रस्त्यावरच ठाण मांडतो. पावसाळ्यात देशभरातील व्याघ्रप्रकल्प तीन ते चार महिन्यांसाठी पर्यटनासाठी बंद असतात. मात्र, कोअर भागात पर्यटन बंद असले तरीही बफर क्षेत्रात मात्र पर्यटनाला मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे पावसाची तमा न बाळगता व्याघ्रप्रेमी पर्यटनासाठी जातात आणि ताडोबातील वाघ त्यांना निराश करत नाही.
याउलट अलीकडच्या काळात ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात कोअर पेक्षा बफर क्षेत्रातच व्याघ्रदर्शन चांगले होत असल्याने पर्यटकांचा ओढा तिकडेच आहे. या व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रालगतच्या या व्हिडिओमुळे पर्यटनाला जाऊ न शकणाऱ्या पर्यटकांनाही व्याघ्रदर्शन झाले आहे. शंभू नावाचा वाघ आणि छोटी मधू नावाच्या वाघिणीला तीन बछडे असून तीनही मादी बछडे आहेत. ते आता बरेच मोठे झाले असून शिकारीला सरावले आहेत.
मात्र, अजूनही शिकारीत ते तरबेज झालेले नाहीत. त्यामुळे हातून शिकार निसटण्याचा प्रकार त्यांच्यासोबत देखील घडत असतोच. आठवडाभराहून अधिक काळ विश्रांती घेतलेला पाऊस गेल्या दोन-तीन दिवसांपासून चांगलाच कोसळत आहे. या पावसाचा आनंद घेण्यासाठी शंभू व छोट्या वाघिणीचा मोठा झालेला बछडा रस्त्यावर निघाला.
नागपूर : समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात भर पावसात एक वाघ उभा असल्याचे दिसून येत आहे. तसेच त्याच्या समोरून हरणांचा एक कळप जात आहे, परंतु त्याला एकही शिकार करता आली नाही. https://t.co/2jrmCKw8Ui #Maharashtra… pic.twitter.com/DdrjcIYgvR
— LoksattaLive (@LoksattaLive) August 14, 2025
त्याचवेळी झाडांच्या दाटीतून हरणांचा एक कळप वेगात येतो आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या झाडांच्या दाटीत शिरतो. त्या कळपातील हरणांवर झडप घालण्याचा प्रयत्न वाघ करतो, पण काही सेकंदातच तो कळप गायब होतो आणि त्या वाघाला हात चोळत राहण्याशिवाय पर्याय उरत नाही. हातातून शिकार निसटल्यामुळे हतबल झालेला वाघाला काहीच सुचत नाही आणि तो तिथल्या तिथेच फेऱ्या मारतो.
निसटलेली शिकार आता परत मिळणार नाही हे त्यालाही कळतं आणि हताश होऊन तो रस्त्यावरच ठाण मांडतो. हा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून समाजमाध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे.