नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पालगतच्या गावांमध्ये वाघाने गावकऱ्यांच्या पाळीव जनावरांची शिकार केल्याच्या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. फक्त व्याघ्रप्रकल्पालगतच्या गावांमध्येच नाही तर एकूणच चंद्रपूर जिल्ह्यात माणसांना सरसावलेले हे वाघ थेट त्यांच्या डोळ्यादेखत पाळीव जनावराची शिकार करतात. जिल्ह्यातला असाच एक व्हिडिओ समाजमाध्यमावर सामाईक झालेला आहे.
या व्हिडिओत वाघ एका गर्भवती गाईला जंगलाच्या एका भागातून ओढत रस्ता ओलांडून जंगलाच्या दुसऱ्या भागात नेताना दिसत आहे. दरम्यान, त्याचवेळी रस्त्यावरुन येणाऱ्या दुचाकीस्वाराची मात्र वाघाला पाहून पाचावर धारण बसते आणि त्याचक्षणी आल्या रस्त्यानिशी ते परत जातात. वन्यजीव छायाचित्रकार स्वराज शेंडे यांनी हा व्हिडिओ चित्रीत केला आहे. त्यांच्या या व्हिडिओला समाजमाध्यमावर भरभरुन प्रतिसाद देखील मिळत आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प पर्यटकांना कधी निराध करत नाही. व्याघ्रदर्शनशी शंभर टक्के हमी देणारा व्याघ्रप्रकल्प अशीच ताडोबाची ओळख अलीकडच्या काही वर्षात झाली आहे. मात्र, याच व्याघ्रप्रकल्पालगतच्या गावांमध्ये मानव-वन्यजीव संघर्षाचा आलेख देखील तेवढाच वाढत चालला आहे. गावकरी आणि वाघ यांचा आमनासामना होतच असतो, पण गावकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचा फडशा वाघाने पाडल्याच्या घटना देखील सातत्याने घडून येतात. वाघाने गावकऱ्यांच्या पाळीव जनावरांची शिकार केली म्हणून राज्यशासनाचे लाखो रुपये नुकसान भरपाईत जात आहेत. मात्र, अजूनही या संघर्षावर वनखात्याला तोडगा काढता आलेला नाही.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे वाघांनी त्यांचा मोर्चा आता गावांकडे वळवला आहे. जेवढे वाघ व्याघ्रप्रकल्पात आहेत, तेवढेच किंबहूना त्यापेक्षाही अधिक वाघ व्याघ्रप्रकल्पाच्या बाहेर आहेत. कित्येकदा या व्याघ्रप्रकल्पाच्या आजूबाजूच्या रस्त्याने जाताना सहज व्याघ्रदर्शन होते. त्यामुळे या रस्त्यांवर वाघाला पाहण्यासाठी देखील गर्दी होत आहे. आता तर चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही रस्त्यावर कधी वाघ तुमच्यासमोर येईल, हे सांगता येत नाही.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत वाघाने गर्भवती गायीची शिकार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत वाघ एका गर्भवती गाईला जंगलाच्या एका भागातून ओढत रस्ता ओलांडून जंगलाच्या दुसऱ्या भागात नेताना दिसत आहे. दरम्यान, त्याचवेळी रस्त्यावरुन येणाऱ्या दुचाकीस्वाराची मात्र वाघाला… pic.twitter.com/vEhkG5sMBq
— LoksattaLive (@LoksattaLive) October 8, 2025
ब्रम्हपूरीत सर्वाधिक वाघ आहेत, तर आता भद्रावती तालुक्यातही वाघांची संख्या वाढत चालली आहे. हा व्हिडिओ भद्रावतीलगतच्या जंगलातील असल्याचे सांगितले जाते. वाघाने चक्क एका गर्भवती गायीची शिकार केली. शिकार करुन तो थांबला नाही, तर ती शिकार ओढत तो थेट जंगलाच्या आत घेऊन गेला. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींच्या मते ती गाय गर्भवती होती आणि हे कुणीतरी थांबवायला हवे होते. काहींच्या मते वाघांच्या जबड्यात कोण स्वत:ची मान घालणार. एवढे मात्र खरे, की हा व्हिडिओ मात्र समाजमाध्यमावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.