नागपूर : मनीषनगर टी-पॉईंट ते बेसा चौकादरम्यान वाहतुकीसाठी अडथळा ठरत असलेले मंदीर अखेर मंगळवारी स्थानांतरित करण्यात आले. त्यामुळे आता हा रस्ता चौपदरी होण्याचा मार्ग मोकळा झाला असून वाहतूक कोंडीपासून बेसावासीयांची सुटका झाली आहे.या मार्गावर विशेषत: सायंकाळी वाहतूक कोंडी होत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने १८ मार्च २०२५ रोजी प्रकाशित केले होते. त्याचवेळी प्रशासनाने हा रस्ता रुंद करण्यात येणार असून वाहतुकीस अडथळा ठरत असलेले मंदिर दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार रस्त्यावरील मंदिर हटवण्यात आले. त्यापूर्वी या मंदिरातील मूर्ती विधिपूर्वक येथून जवळ असलेल्या नवीन मंदिरात स्थानांतरित करण्यात आली.
नवीन नागपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेसा, पिपळा, वेळाहरी, घोगली या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती निर्माण झाली आहे. तसेच अनेक गृहनिर्माण प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अनेक खासगी शाळा या भागात आहेत. बेसा चौक ते मनीषनगर टी-पॉईंट दरम्यान मॉल्स, सुपरमार्केट, हॉटेल, खाद्यापदार्थ विक्रेते, भाजी, फळ विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. अरुंद रस्ता आणि त्यात विविध अडथळे यामुळे या रस्त्यावर सायंकाळी दुचाकी चालवणे म्हणजे तारेवरची कसरत ठरत होती. आता मंदिर हटवले असून रस्त्यांच्या कडेला झालेले अतिक्रमणही काढण्यात येणार आहे.
वाहनांच्या दोन किलोमीटर लांब रांगा!
नवीन नागपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेसा आणि मनीषनगरातील नागरिकांना अनियोजित वाहतुकीमुळे अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. चिंचोळे रस्ते, चौफेर अतिक्रमण आणि वाहनांची बेसुमार संख्या यामुळे जीवघेणी वाहतूक कोंडी आता नित्याचीच झाली आहे. विशेषत: मनीषनगर टी-पॉईन्ट ते बेसा चौक दरम्यान दररोज सायंकाळी ६ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत दोन किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागत आहेत.
रोज एक अपघात
रस्ता लहान असल्याने वाहतूक विस्कळीत होते. सायंकाळी ६ वाजता नंतर दोन किलोमीटर लांबच लांब वाहनाच्या रांगा लागतात. बेसा ते मनीषनगर रस्ता चारपदरी झाला पाहिजे, अडचणीचे ठरत असलेले मंदिर तत्काळ नवीन ठिकाणी हलवले पाहिजे. रस्त्याच्या आजूबाजूला गट्टू (पेवर ब्लॉक) न लावल्याने वाहने खाली उतरून घसरतात. रोज एक अपघात या ठिकाणी होत आहेत
अभिनव फटिंग.
नगरपंचायत उदासीन नगरपंचायत बेसा अतिक्रमण काढण्यास दिरंगाई करत आहे. रस्ता चारपदरी केल्यास वाहतूक विस्कळीत होणार नाही आणि रोजचे अपघात थांबतील. बेसा, पिपळा, घोगली या ठिकाणी जाण्याकरिता मनीषनगर मार्गेच जावे लागते. त्यामुळेही वाहतूक कोंडी होते.
मनोज कढव.
आधी अतिक्रमण काढा अतिक्रमण काढून रस्ता रुंद करणे आवश्यक आहे. रस्त्यालगत वाहने उभे असतात, रस्ता लहान असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होते. हे किती दिवस सहन करणार. सहनशीलतेलाही मर्यादा आहेत.
डॉ. अरविंद बुटले.