नागपूर : मानव-वन्यजीव संघर्ष अद्यापही थांबवता न आलेल्या वनखात्याने नुकसान भरपाईचा पर्याय शोधला. परंतु, आता याच खात्याच्या अधिकाऱ्यांनी मानव-वन्यजीव संघर्ष होऊच नये म्हणून चक्क वाघांना जेरबंद करण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे वनखात्याला वाघ जंगलात नाही तर पिंजऱ्यात जेरबंद ठेवायचे आहेत का, असा प्रश्न वन्यजीवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर वनविभागातील रामटेक व पारशिवनी या पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या वन्यजीव क्षेत्रात गेल्या दोन महिन्यांपासून वाघाचे वास्तव्य आहे. हा वाघ नुकताच आईपासून वेगळा झाला असून तो स्वत:चा अधिवास निर्माण करण्यासाठी जंगलाच्या सीमेवर सातत्याने आढळून येत आहे. यादरम्यान, त्याने जंगलाच्या सीमेवर काही पाळीव जनावरांची शिकार केली. मात्र, त्याने गावात जावून कोणत्याही माणसावर हल्ला केला नाही किंवा जखमी केले नाही. तरीही गावकऱ्यांनी तक्रार केली म्हणून वनखात्याने थेट त्याला जेरबंद करण्याचा आदेश काढला. सोबतच वाघाला जेरबंद करण्यासाठी अमरावतीवरुन चमू देखील बोलावली. त्यामुळे वनखात्याच्या अधिकाऱ्यांना ‘त्या’ वाघाला पकडण्याची एवढी घाई का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : राजकीय आखाड्यात, चौका-चौकात, कट्ट्यावर रंगू लागल्या ‘ताई’ आणि ‘भाऊ’च्या चर्चा; सट्टाबाजारात…

राज्याच्या वनखात्याने गेल्या पाच वर्षांत सुमारे २५ वाघांना विविध कारणांसाठी जेरबंद केले. यातील काही वाघांचा मृत्यू झाला. काही प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात आले तर काही कायमस्वरुपी जेरबंद आहेत. वाघांच्या सुटकेसाठी खात्याने समिती नेमली, पण या समितीला कधीच गांभीर्याने घेतले नाही. परिणामी, जेरबंद वाघांच्या नशिबी कायमस्वरुपी पिंजरा आला. त्यामुळे या तरुण वाघाचेही भवितव्य पिंजऱ्याआड बंद होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तरुण वाघ गावाच्या सीमेवर फिरत असेल तर त्याविषयी गावकऱ्यांमध्ये जनजागृती करुन त्यांना सूचना दिल्या जातात. मानद वन्यजीव रक्षकांची ही जबाबदारी असून त्यांची नेमणूकच गाव आणि वनखाते यांच्यातील दुवा म्हणून केली जाते. मात्र, त्यांनीही यासाठी स्वत:हून पुढाकार घेतलेला नाही. वनखात्याने त्याठिकाणी चमू तैनात करणे, त्या वाघाला जंगलाच्या दिशेने वळवण्यासाठी प्रयत्न करणे, अशा अनेक उपाययोजना अपेक्षित आहेत. या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करुन वाघाला जेरबंद करण्यास प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडून मसूदा मान्य करुन उपवनसंरक्षक (नियोजन व व्यवस्थापन-वन्यजीव) कुलराज सिंह यांनी वाघाला जेरबंद करण्याचे आदेश काढले. याबाबत संपर्क साधला असता त्यांनी रजेवर असल्याचे सांगितले. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता यांनीही प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा – वर्धा : समुद्रालगत बेटांवरील मतदारसंघाची जबाबदारी जिल्ह्यातील ‘या’ नेत्याकडे

शेजारच्या मध्यप्रदेश पेंच व्याघ्रप्रकल्पात अशी स्थिती उद्भवल्यास वाघांना हत्तीच्या सहाय्याने जंगलात वळवले जाते. गावकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाते, त्यांना सूचना दिल्या जातात. मध्यप्रदेश वनखात्याची युक्ती महाराष्ट्र वनखात्यानेही वापरायला हवी. – डॉ. जेरील बानाईत, वन्यजीव अभ्यासक.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tigers should not be in the forest should they be in cages wildlife lovers asked what is the case find out rgc 76 ssb
Show comments