नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य आता व्याघ्रदर्शनाबाबत ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाला टक्कर देऊ लागले आहे. आतापर्यंत पर्यटकांचा ओघ हा ताडोबाकडेच होता, पण आता मात्र पर्यटक नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य, टिपेश्वर अभयारण्याकडे वळू लागले आहेत. वाघांचे साम्राज्य फक्त ताडोबातच नाही, तर ते इतरत्र देखील आहे, हे समोर येणाऱ्या चित्रफितींनी दाखवून दिले आहे. टिपेश्वर अभयारण्यातील असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात वाघीणीला उकाडा असह्य झाला आहे आणि ती पाणवठ्याजवळ पोहोचलीसुद्धा आहे, पण पाणवठ्यात उतरताना मात्र तिची फार कसरत होत आहे. ‘तलाववाली’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वाघिणीची ही कसरत वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश बाळापुरे यांनी चित्रित केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात असलेले टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे वाघाच्या संवर्धनाच्या जागतिक प्रयत्नात आशेचा किरण बनले आहे. अलिकडच्या काही वर्षांत, अभयारण्यात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, तसेच व्याघ्रदर्शनातही वाढ झाली आहे. त्यामुळे वनखात्यातील अधिकारी, कर्मचारीच नाही तर वन्यजीवप्रेमीही आनंदले आहेत. या अभयारण्यात वाघांची संख्या वाढण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे खात्याचे उत्तम व्यवस्थापन. वाघांच्या संख्येचाच नाही तर त्यांच्या सुरक्षिततेचा मागोवा घेण्यासाठी याठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहे. एवढेच नाही तर नियमित निरीक्षणासह एक मजबूत पाळत ठेवणारी यंत्रणा महत्त्वाची ठरली आहे. या प्रयत्नांमुळे वाघांची हालचाल आणि वाघाची एकूण वागणूक याचा मौल्यवान तपशीलच उपलब्ध झाला नाही, तर संभाव्य धोके ओळखण्यात आणि ते कमी करण्यातही मदत झाली आहे. अभयारण्याच्या वाढीव संरक्षण उपायांमुळे वाघांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा – आमदार रवी राणांच्या दबावाखाली अधिकाऱ्याची बदली, उच्च न्यायालयाने नगररचना विभागाला ठोठावला दंड

हेही वाचा – वर्धा : इराणी टोळीच्या सदस्याला अटक; वयोवृद्ध व्यक्तींनाच हेरायचे अन्…

वाघांच्या संख्येत वाढ झाल्याने साहजिकच अधिक वारंवार व्याघ्रदर्शन घडत आहे. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना आता त्यांच्या नैसर्गिक अधिवासात या भव्य प्राण्यांना भेटण्याची अधिक शक्यता आहे. यामुळे निसर्ग पर्यटनाला चालना मिळाली आहे. ज्यामुळे देशभरातील आणि बाहेरील वन्यजीवप्रेमी टिपेश्वर अभयारण्याकडे आकर्षित होत आहेत. टिपेश्वर अभयारण्याचे हे यश संपूर्ण भारतातील व्याघ्रसंवर्धनाच्या प्रयत्नांसाठी महत्त्वाचे ठरले आहे. येथील मानव-वन्यजीव संघर्ष जवळजवळ संपल्यात जमा आहे. उत्तम व्यवस्थापनामुळे वाघ केवळ टिकून राहत नाहीत तर त्यांची भरभराट होते. अलीकडच्या काळात वाघांच्या, वाघिणीच्या आणि बछड्यांच्या समोर येणाऱ्या चित्रफिती याचेच उदाहरण आहे. या चित्रफितीत देखील उकाड्याने हैरान झालेली ‘तलाववाली’ ही वाघीण पाणवठ्यात उतरण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे आणि शेवटी ती त्यात यशस्वी झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tigress try hard to get into the water video of tigress in tipeshwar sanctuary rgc 76 ssb