गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील पोलीस जांबिया-गट्टा पोलीस हद्दीत येणाऱ्या मोडस्के जंगल पारिसरात आज, बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास झालेल्या चकमकीत दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. चकमकस्थळी शोधमोहीम सुरूच असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो, असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.
छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या आक्रमक नक्षलविरोधी अभियानामुळे सैरभैर झालेले नक्षली आता गडचिरोलीच्या सीमाभागात सक्रिय झाले आहे. दरम्यान, १७ सप्टेंबररोजी जांबिया गट्टा पोलीस स्टेशन हद्दीतील मोडस्के जंगल परिसरात गट्टा दलमचे काही जहाल नक्षल लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाली होती. यावरून अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक यांच्या नेतृत्वात नक्षलविरोधी पथक सी ६० च्या पाच तुकाड्या अभियानासाठी रवाना करण्यात आल्या.
यावेळी गट्टा पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल १९१ च्या जवानांनी सदर परिसराला वेढा घातला होता. शोधमोहिमेदरम्यान लपून असलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. जवानांनीही त्याच तीव्रतेने प्रत्युत्तर दिले. यावेळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली. पोलिसांचा वाढता दबाव बघून नक्षलवाद्यांनी जंगलाच्या दिशेने पळ काढला. दरम्यान जवानांनी घटनास्थळी शोध घेतला असता दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह, शस्त्र व साहित्य आढळून आले. चकमकीनंतर या परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान करण्यात आले आहे.
मृत नक्षलवाद्यांची ओळख पटविणे सुरु
अभियानादरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला, यास जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.चकमकीनंतर परिसरात घेण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, ते गट्टा दलमशी संबंधित असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनास्थळी काय आढळले ?
घटनास्थळावरून पोलिसांनी एक ए-४७ रायफल, एक अत्याधुनिक पिस्तूल, जिवंत दारुगोळा तसेच नक्षलवादी साहित्य जप्त केले आहे. मागील महिन्यात २५ आगस्टरोजी भामरागड तालुक्यातील कोपर्शीच्या जंगलात झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांनी चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. या धडक कारवाईमुळे नक्षलवाद्यांची कंबर मोडली असून, जवानांचे अभियान अजूनही सुरू आहे, असे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.