नागपूर: आगामी शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) राज्यातील विद्यापीठांसह संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणात नवीन धोरण लागू होणार आहे. या धोरणानुसार आता विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीमध्येही बदल होणार आहेत. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाकडून ६० गुणांची तर महाविद्यालयांकडून ४० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे नवीन धोरणामध्ये सत्रांत परीक्षा पद्धती राहणार आहे.

येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन धोरण अवलंबले जाणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. हा बदल पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात पहिल्या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू राहणार आहे. यासाठी सुकाणू समितीच्या शिफारशीनुसार काम सुरू करण्यात आले होते. यात अभ्यासक्रम आराखडा, त्यासोबत श्रेयांक आराखडाबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह अनेक विद्यापीठांनी यासंदर्भात सूचना जाहीर केल्या आहेत. यानुसार आगामी शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) पदवी व पदव्युत्तर शिक्षणात नवीन धोरण लागू होणार आहे. यात पदवी चार वर्षांची तर पदव्युत्तर पदवी एका वर्षाची राहणार आहे. तर परीक्षा पद्धतीमध्येही बदल होणार आहेत. सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार ८० गुणांची परीक्षा विद्यापीठ स्तरावर तर २० गुणांची परीक्षा महाविद्यालय स्तरावर होत होती. मात्र, आता नवीन पद्धतीने ४० गुणांची परीक्षा ही महाविद्यालय स्तरावर तर ६० गुणांची परीक्षा विद्यापीठ स्तरावर होणार आहे. नवीन धोरणासंदर्भात विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असलेले संभ्रम दूर करण्यासाठी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी महाविद्यालय स्तरावर कार्यशाळा घेऊन शंकांचे निराकरण केले जाणार आहे.

हेही वाचा – भारतातील पहिल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरने दिले कोल्ह्याला जीवदान…

हेही वाचा – “मुख्यमंत्री महोदय, दहशतीत काम करतोय, लक्ष द्या,” कुणी घातले साकडे, ते वाचा…

विषय निवडीची नवी पद्धत अशी असणार?

नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता पदवीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याला प्रवेश घेताना तीन विषय निवडणे अनिवार्य असेल. तर दुसऱ्या वर्षात गेल्यावर तीनपैकी एक विषय अनिवार्य असेल आणि उर्वरित दोनपैकी एक विषय त्याला पर्याय म्हणून घेता येईल. तिसऱ्या वर्षात गेल्यावर मात्र, त्याला एकच विषय घेऊन पदवीचे शिक्षण पूर्ण करता येईल. पदवीच्या चौथ्या वर्षात त्याला सन्मानपूर्वक पदवी (ऑनर्स) किंवा संशोधन यातील एक पर्याय निवडून शिक्षण घ्यावे लागणार आहे. म्हणजेच नवीन धोरणानुसार पदवीच्या पहिल्या वर्षात तीन अनिवार्य विषय, दुसऱ्या वर्षात एक मुख्य व एक दुय्यम विषय आणि तिसऱ्या वर्षात एकच मुख्य विषय विद्यार्थ्यांना घ्यावा लागणार आहे.