नागपूर : वाघाच्या नजरेच्या टप्प्यात शिकार आली आणि त्याने ती सहज सोडून दिली असे कधी होत नाही. अगदीच कधीतरी असा प्रसंग घडतो. मात्र, अतिशय बलदंड अशा वाघांचे वर्चस्व झुगारून, त्यांना लढाईत हरवून आपले स्थान अढळ ठेवणाऱ्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील “शंभू” नावाच्या वाघाचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. वन्यजीव छायाचित्रकार अरविंद बंडा यांनी हा व्हिडीओ चित्रित केला आहे.
“शंभू” या वाघाचा चेहरा आणि शरीरयष्टीच फक्त राकट आहे, पण तसा तो सौम्य आहे. त्याच्यात इतर वाघांमध्ये असतो तसा आक्रमकपणा नाही. मात्र, जेव्हा अधिवसाचा विषय येतो, तेव्हा तो त्याच्या अधिकारक्षेत्रात घुसखोरी करू पाहणाऱ्या वाघांशी लढाई करून त्यांना हाकलून लावायला मागेपुढे पाहात नाही. आगरझरी, देवाडा, अडेगाव आणि जुनोना असे सर्व जंगल क्षेत्र एकमेकांना लागून आहे. काही वर्षांपूर्वी ‘खली’ नावाच्या एका नर वाघाचा मोठा दरारा तिथे होता. तो मृत्युमुखी पडला आणि त्याच्या नंतर त्या परिसरात ‘तारू’ नावाच्या वाघाने आपले अस्तित्व निर्माण केले. काही महिन्यांतच ‘शंभू’ नावाच्या वाघाने तिथे प्रवेश केला आणि ‘तारू’ला आपला तळ हलवावा लागला. अनेक बलदंड वाघांनी आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण ‘शंभू’ने आपले भक्कम स्थान कायम राखले. या वाघाने या परिसरात आल्यानंतरच आपला दरारा निर्माण केला होता.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील "शंभू" नावाच्या वाघाचा असाच एक व्हिडिओ समोरhttps://t.co/2jrmCKw8Ui
सौजन्य : – अरविंद बंडा#Viralvideo #socialmedia #Tiger pic.twitter.com/rxbfzi13YA— LoksattaLive (@LoksattaLive) June 29, 2025
‘शर्मिली’ ‘छोटी मधू’ ‘डब्ल्यू’ तसेच ‘कॉलरवाली’ या वाघिणींसोबतही तो बघितला गेला आहे. आता काही दिवसांपूर्वी “शंभू” त्याच्या अधिवासात निवांतपणे बसलेला दिसून आला. तो अगदी शांतपणे पहुडला होता आणि त्याच्या मागून दोन रानडुकरे येत होती. रानडुक्कर आणि वाघ दोघांनाही एकमेकांची चाहूल नव्हती. पण थोड्याच वेळात शंभुचे कान टवकारले. त्याने मागे वळून पाहिले आणि निवांत पडलेला “शंभू” हळूच उठायला लागला. आता तो नक्कीच या दोघांची शिकार करणार असे वाटत होते आणि पर्यटकांनीही श्वास रोखून धरला होता. पण मागे मान वाळवलेल्या “शंभू” ने पुन्हा मान वळवली आणि तो समोर चालायला लागला.