गोड बासुंदीत मिसळली राजकीय साखर; शहरात मध्यरात्रीपर्यंत उलटल्या पंगती
कोजागिरी पौर्णिमा अर्थात शरद पौर्णिमा हा शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येणारा अनेकांचा आवडता सण. या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून पृथ्वीवर अवतरते आणि मध्यरात्री ‘को जागर्ति’ अर्थात ‘कोण जागत आहे’, हे बघत मनुष्याचे प्रयत्न न्याहाळत असते, अशी एक धारणा आहे. हे न्याहाळताना सगळे स्वच्छ दिसावे म्हणून नभातला तेजाळलेला चंद्र तिला मदत करीत असतो. हा चंद्र तसा प्रत्येकच कोजागरीला तेजाळतो. परंतु यंदा जणू निवडणुकीमुळे त्याचे तेज अधिकच चकाकत होते. कोजागिरीच्या गोड बासुंदीत राजकीय साखर मिसळल्याने तिचा गोडवाही अनेक पटीने वाढला होता. शहरात अगदी मध्यरात्रीपर्यंत पंगती उठत होत्या.
दसऱ्यानंतर येणारी कोजागिरी दरवर्षी घराघरात आणि सार्वजनिक ठिकाणीही साजरी केली जाते. मात्र त्याचा गाजावाजा होत नाही. यंदा मात्र ठिकठिकाणी कोजागिरीच्या कार्यक्रमाला सार्वजनिक स्वरूप आल्याचे दिसून आले. दूध आणि नाश्ता हा पारंपरिक मेन्यू बाजूला ठेवून या कार्यक्रमात चक्क पंगती उठल्या. त्यावर राजकीय छापही होती. त्याला निमित्त होते. यंदाची विधानसभा निवडणूक.
कोजागिरीच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी जमणारी गर्दी हेरून राजकीय पक्षांनी त्याचा अतिशय कौशल्याने या सणाचा राजकीय प्रचारासाठी वापर करून घेतला. एरव्ही निवडणुकीच्या प्रचारावर होणाऱ्या खर्चाचा हिशेब उमेदवारांना द्यावा लागतो, खर्च मर्यादा कमी असल्याने राजकीय पक्षांची पंचाईत होते. त्यामुळे त्यातून पळवाटा शोधल्या जात आहेत. त्यासाठी विविध क्लृप्त्यांचा वापर केला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या कोजागिरीचा प्रचारासाठी वापर हा यातीलच एक भाग होता. दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील जयप्रकाशनगर व चिंचभुवनसह शहरातील इतरही मतदारसंघात शनिवारी आणि रविवारी झालेल्या कोजागिरीच्या कार्यक्रमांवर राजकीय छाप दिसून आली. अनेक ठिकाणी या कार्यक्रमांना राजकीय पक्षांनी पुरस्कृत केल्याचे दिसून आले. चिंचभुवनमध्ये शनिवारी एकाच वेळी दहा ते बारा ठिकाणी कोजागिरीचे कार्यक्रम पार पडले. सहकारनगरातही कोजागिरी उत्सव राजकीय आशीवार्दाने अनेक ठिकाणी उत्साहात साजरा झाला.
ज्या भागात कार्यक्रम आयोजित केला आहे, तेथे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्या भागातील नगरसेवकांनी जाऊन आपल्या पक्षाची भूमिका मांडायची. अप्रत्यक्षरित्या प्रचारच करायचा. मात्र याचा खर्च संबंधित मंडळ, गाळेधारक किंवा इतरांच्या नावे दाखवायचा, असा हा सारा मामला होता. काही ठिकाणी नागरिकांनी राजकीय पक्षाच्या उदारतेचा मुक्तपणे लाभ करून घेतला तर काही ठिकाणी राजकीय हस्तक्षेपाला सरळ विरोध दर्शवण्यात आला. पुढील वर्षी निवडणुका नसताना कोजागिरी अशीच साजरी होईल की तेव्हा केवळ दुधावरच तहान भागवावी लागेल, अशी चर्चाही शहरात अनेक ठिकाणी रंगली होती.