चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे मोठे नेते संतोषसिंह  रावत यांचेवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना तत्काळ अटक करा अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. दरम्यान रावत समर्थकांनी मुल येथे रास्ता रोको आंदोलन करत आरोपींना अटक केण्याची मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष म्हणजे वडेट्टीवार गटाचे माजी नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर हॉकी स्तिकने हल्ला झाल्यानंतर रावत यांच्यावर गोळीबार झाला. वडेट्टीवार गटाचे दोन नेत्यावर हल्ला झाल्याने यामागे खरा सुत्रधार कोण याचा शोध घेऊन त्याला अटक करावी अशीही मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून ४८ तासाच्या आत आरोपी व मुख्य सूत्रधार यांना बेड्या ठोकाव्या असा अन्यथा जिल्हा काँग्रेसच्या वतीने मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा अल्टिमेटम वडेट्टीवार यांनी दिला आहे. 

हेही वाचा >>> नागपूर : ‘एम्स’मध्ये प्रथमच मेंदूमृत रुग्णाच्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण; तीनच दिवसात एम्सला दुसरे प्रत्यारोपण

राजकीय नेत्यांवर गोळीबार करण्याची घटना जिल्ह्यात प्रथमतः घडलेली असून पोलीस विभागामार्फत या गंभीर घटनेची कसून चौकशी करून हल्लेखोर दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील माजी मंत्री आ. वडेट्टीवार यांनी केली आहे.हल्लेखोरांसह मुख्य सुत्रधाराच्या अटकेसाठी मूलमध्ये रावत समर्थकांचा सकाळपासून  मुल येथील गांधी चौकात धरणे देत धरणे देत रास्ता रोको केला आहे. या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. रावत यांच्यावर हल्ला करणारे अद्यापही पोलिसांना गवसले नाही. ज्या वाहनातून हल्लेखोर आला त्या वाहनाचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागला असला तरी तो नंबर फेक असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्यास वेळ लागत असल्याची माहिती आहे. आरोपी चा सुगावा लागला नसल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay wadettiwar demand to immediate arrest of congress leader santosh rawat attackers rsj74 zws