अकोला : विविध परीक्षांच्या शुल्कांमध्ये मोठी वाढ झाल्याने विद्यार्थी, पालकांवर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसत आहे. मात्र, शासनाच्या एका निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळेल. जाणून घेऊ या नेमकी ती योजना काय…

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून शासकीय संगणक टंकलेखन वेगाचे प्रमाणपत्र परीक्षा जीसीसी-टीबीसी व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अमृत संस्थेच्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करण्यात येत आहे. अमृतच्या लक्षित गटामध्ये खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी ब्राह्मण, बनिया, राजपुरोहित, कम्मा, कायस्थ, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, मारवाडी, ठाकूर, त्यागी, सेनुगुंथर, गुजराती, ऐयांगर, जाट, सिंधी, कानबी, राजपूत, कोमटी, हिंदू नेपाळी, भूमिहार आदी जातींचा समावेश आहे. यासाठी उमेदवारांना http://www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अमृतच्या जिल्हा कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

अडीच लाखांहून कमी उत्पन्न, तर विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची शिष्यवृत्ती

पालकांचे उत्पन्न अडीच लाखांहून कमी असेल तर त्यांच्या इयत्ता नववी ते बारावी दरम्यान शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती योजनेसाठी जिल्ह्यातील २०१ शाळांची निवड करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने केंद्र शासनाच्या ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. नववी ते दहावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक ७५ हजार रुपये आणि अकरावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना एक लाख २५ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. अर्जासोबत जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, गुणपत्रक, शाळा प्रवेश प्रमाणपत्र, बँक खात्याचा तपशील आणि पासपोर्ट छायाचित्र अपलोड करणे अनिवार्य आहे. पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करून या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.