वर्धा: स्त्री ही आदिशक्ती. त्याचा प्रत्यय पौराणिक, मध्ययुगीन, ऐतिहासिक व आता वर्तमानकाळात पण आलेला आहे. सिंदूर ऑपरेशन हे त्याचे प्रतीक ठरावे. नवरात्रातील देवींची विविध रूपे ही विविध शक्तीचे प्रतीक म्हटल्या जातात. पण थेट हातात तलवार घेत सज्ज होण्याचा प्रकार जर आता दिसून येत असेल तर कोणीही चकित होणारच. रात्रीच्या वेळेस सलग तीन तास महिला, मुली एकत्र येत हा सशस्त्र सराव चालला. नवरात्रात दुर्गा मातेची आराधना ही शक्ती साधना करून होते. म्हणून लाठीकाठी, तलवार प्रशिक्षण ही काळाची गरज, अशी भूमिका जागर फॉउंडेशन व शक्ती साधना उपक्रमाच्या संयोजक श्रेया देशमुख मांडतात.

समाजात महिलांनी चूल मूल इतकेच मर्यादित राहू नये. तिने सशक्त व्हावे. भारत मातेच्या चरणी सेवा अर्पण करावी. या प्रशिक्षणामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो. स्वरक्षण होते. गैरकृत्यास आळा बसतो, असा युक्तीवाद आयोजक करतात. त्याहेतूने गत पाच दिवस हे लढावू शिक्षण देण्यात आले. गरबा हा संस्कृतीचा भाग झाला. पण हे प्रशिक्षण स्व संरक्षण देणारे ठरते. दांडिया सोबत आता मुलींच्या हातात दंड शोभून दिसतो, असे मत. या प्रशिक्षणात मुलींना लाठी चालवीण्याचे, तलवार फिरविण्याचे, हल्ला झाल्यास त्यास प्रत्युत्तर देण्याचे, स्वतःचा बचाव करण्याची विद्या देण्यात आली. सराव समारोपप्रसंगी मुलींनी सादर केलेल्या कवायती पाहून नागरिक दंग झाल्याचे पाहायला मिळाले.

नारीशक्तीचा आवाज बुलंद करणारे हे प्रशिक्षण महिला मुलींना एक नवे भान देणारे ठरेल, अशी भावना स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रवीणा जैन यांनी समारोपवेळी व्यक्त केली. चारित्र्य निर्माण व त्यातून राष्ट्र निर्माण असा हेतू स्तुत्य असल्याचे मत उद्योजक मोनाली ढोमणे यांनी व्यक्त केले.  जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, माजी जि. प. उपाध्यक्ष वैशाली येरावार, क्रीडा भारतीचे अध्यक्ष हरीश गांधी यांनी उपक्रमाचे कौतुक केले. आलेल्या अडचणीवर मात करीत हे प्रशिक्षण यशस्वी ठरले, अशी भावना श्रेया देशमुख यांनी व्यक्त केली

याप्रसंगी मुकुंद पिंपळगावकर, नरेंद्र नरोटे, गुंजन मिसाळ, जयंत येरावार, जयंत कावळे, माधव वानखेडे, नीलेश कोळेकर, गिरीश कांबळे प्रामुख्याने हजर होते. आयोजनात सारंग परिमल, अमित प्रसाद, योगेश केळकर, किशोर झाडे, अभिजित पारगावकर, मोनिका नगरे, दीपाली हिंगणीकर, मनिषा मशनकर, मयुरी करंडे, पूनम डकरे, नीता सूर्यवंशी, विशाखा जोशी, पल्लवी मोहाडकर आदींचे योगदान लाभले.