नागपूर : पावसाळा सुरू झाला तरी विदर्भात अजूनही म्हणावा तसा पाऊस नाही. मान्सूनने जवळजवळ राज्य व्यापले असले तरीही पावसाची कृपादृष्टी नाहीच. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. माणसांनाच जिथे उकाडा सहन होईनासा झालाय, तिथे प्राण्यांना तो कसा सहन होणार. माणसांपुढे एसी, कुलरचे पर्याय आहेत, पण जंगलातील प्राण्यांसाठी पाणवठा हाच आधार आहे आणि “झायलो” या वाघाची ही कृती तेच दर्शवणारी आहे. वन्यजीव छायाचित्रकार इंद्रजित मडावी यांनी हा व्हिडीओ चित्रित केला आहे.
झायलोचे गुण…
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आधी पळसगाव बफर क्षेत्रात साम्राज्य स्थापन करणारा आणि आता पळसगावसोबतच बेलारा, कोलारा, मदनापूर परिसरात साम्राज्य स्थापन करणारा “झायलो” हा वाघ आकाराने अतिशय मोठा आणि धिप्पाड शरीरयष्टीचा आहे. सर्वच क्षेत्रात तो आपला दबदबा निर्माण करताना दिसून येतो. कधीकाळी त्याने पाळीव जनावरे मारली, पण तृणभक्षी प्राणी हेच त्यांचे खाद्य आहे. बलदंड शरीर आणि पिळदार शरीरयष्टी असलेला “झायलो” जेवढा चालतो, तेवढाच तो पोहण्यातही निपुण आहे.
“झायलो” नाव का…
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांची नावे त्यांच्या दिसण्यावरून, त्यांच्या अधिवास क्षेत्रावरून ठेवण्यात आली आहेत. मात्र, “झायलो” या वाघाच्या नावामागची कथा काही वेगळीच आहे. त्याचे नाव चक्क झायलो या वाहनावरून ठेवण्यात आले आहे. महेंद्रा कंपनीचे हे वाहन रस्त्यावरून धावत होते आणि त्याचवेळी हा वाघ वयाने लहान असला तरी शरीरयष्टीने धिप्पाड होता. त्यामुळे वन्यजीव छायाचित्रकारांनी त्याला या गाडीची उपमा दिली आणि तेव्हापासून हा वाघ “झायलो” या नावाने ओळखला गेला. त्याच्या चेहऱ्यावर देखील “XY” अशी खूण दिसते. त्याची मूळ ओळख ही “टी-१७८” अशी आहे.
पावसाळा सुरू झाला तरी विदर्भात अजूनही म्हणावा तसा पाऊस नाही. जंगलातील प्राण्यांसाठी पाणवठा हाच आधार आहे आणि "झायलो" या वाघाची ही कृती तेच दर्शवणारी आहे.
— LoksattaLive (@LoksattaLive) June 17, 2025
व्हिडीओ सौजन्य: इंद्रजित मडावी, वन्यजीव छायाचित्रकारhttps://t.co/2jrmCKvB4K#Maharashtra #WildAnimals pic.twitter.com/e2q9TyJVuh
“झायलो” चे कुटुंब
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील आगरझरी या प्रसिद्ध बफर क्षेत्रात २०१९ च्या सुमारास ‘छोटी मधू’ वाघिणीच्या पोटी “झायलो”चा जन्म झाला. “बजरंग” हा वाघ त्याचे वडील. या वाघिणीला त्यावेळेस तीन पिल्ले झाली होती. त्यात दोन माद्या व एका नराचा समावेश होता. या तिन्ही बछड्याचा वडील म्हणजेच या व्याघ्रप्रकल्पातील प्रसिद्ध “बजरंग” हा वाघ होता. या तीन बछड्यामधील एक मादी बछडा आकाराने काहीसा लहान असल्याने त्याला त्यावेळेस “नॅनो” असे नाव दिले गेले होते. आकाराने मोठा असलेला नर बछडा “झायलो” नावाने ओळखला जाऊ लागला. दुसरे मादी बछडा “बेला” या नावाने नंतर ओळखले गेला.