यवतमाळ : तालुक्यातील बेलोरा (मंगरूळ) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकावर विद्यार्थिनींसोबत गैरवर्तनाचा आरोप करून गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना महाराष्ट्र दिनी १ मे रोजी घडली. या प्रकरणी मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून ११ ग्रामस्थांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. बेलोरा येथील संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला बेदम मारहाण करून त्याची दुचाकी देखील पेटवून दिली. या घटनेने गावात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केल. पुरुषोत्तम मंडलिक असे मुख्याध्यापकाचे नाव असून पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना ताब्यात घेत यवतमाळात आणले होते.

महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर काही पालकांनी संबंधित मुख्याध्यापक विद्यार्थिनींसोबत गैरवर्तणूक करतात, असभ्य भाषेत बोलत असल्याचं सांगत वाद घातला होता. त्यावेळी, बघता-बघता मोठा जमाव शाळेत पोहोचला आणि मुख्याध्यापकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात झाली. दरम्यान, ही माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून मुख्याध्यापकाला जमावाच्या तावडीतून सोडवलं. मात्र, संतप्त जमावाने मुख्याध्यापकाची दुचाकी जाळली. यात दुचाकी जळून खाक झाली आहे. या प्रकरणी अद्याप कुठलीही तक्रार दाखल झाली नसून, पोलिसांनी गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावला आहे.

पालकांनी या संदर्भात कुठलीच तक्रार केली नसली तरी शाळा व्यवस्थापन समितीने मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दिली आहे. तर, मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून ११ ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर शिक्षक व विद्यार्थ्यांमध्येही काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पुढील तपास पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे, मुख्याध्यापकांच्या वर्तणुकीबाबत विद्यार्थ्यांनी पालकांकडे तक्रार केल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीने या मुख्याध्यापक बदलून देण्याची मागणी काही दिवसांपूर्वी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली होती. त्याची तक्रार करूनही शिक्षण विभागाने त्याची बदली केली नाही. या तक्रारीचा राग मनात धरून महाराष्ट्र दिनी झेंडावंदनाच्या कार्यक्रमास मुख्याध्यापकाने शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सदस्यांना बोलावले नसल्याची माहिती आहे. यामुळे गावकऱ्यांनी मुख्याध्यापकास जाब विचारत त्याला चोप दिला .

यापूर्वीही विद्यार्थिनीचे शोषण

बेलोरा जिल्हा परिषद शाळेत तीन वर्षांपूर्वी एका शिक्षकाने विद्यार्थिनिसोबत शाळेतच अश्लील कृत्य केले होते. त्यावेळीसुद्धा गावकऱ्यांनी त्या शिक्षकास नको त्या अवस्थेत रंगेहात पकडून चोप दिला होता. पुढे हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. त्या शिक्षकाला कारागृहाची हवासुद्धा खावी लागली. त्याच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये दहशत आहे.