गळफास घेऊन किंवा विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा घटना नेहमी घडतात. मात्र, मारेगाव तालुक्यात एका तरुणाने चक्क वीज खांबावर चढून जिवंत विद्युत प्रवाहाच्या तारांवर स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. बळीराम मारोती घाटे (२२, रा. बोटोनी) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
बोटोनी गावाजवळ एका बंधाऱ्याशेजारी असलेल्या विद्युत खांबावर हा युवक रात्री चढला. कोणालाही काही कळायच्या आत त्याने चक्क जिवंत विद्युत तारांवर स्वतःला झोकून देत आपले जीवन संपविले. विजेच्या धक्क्याने तो खाली कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. बळीरामने या पद्धतीने आत्महत्या का केली, याचे कारण अस्पष्ट आहे. त्याच्या पश्चात आई , दोन भाऊ व बहीण असा परिवार आहे.