जळगाव – तालुक्यातील गाढोदा येथे गिरणा नदीत पोहण्यास गेलेल्या १५ वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. तर निमखेडी शिवारात रेल्वे पुलाजवळ दुर्गा विसर्जनासाठी गेलेला तरूण वाहून गेल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. पैकी गाढोद्यातील मुलाचा मृतदेह हाती लागला असला, तरी निमखेडीत बुडालेल्या तरूणाचा सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही.

हिमेश संतोष पाटील (१९, रा.मयुरेश्वर कॉलनी, जळगाव) असे  निमखेडी रेल्वे पुलाजवळ गिरणा नदी पात्रात दुर्गा विसर्जनासाठी गेल्याने बेपत्ता झालेल्या तरूणाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजता तो आई आणि बहिणीसोबत गिरणा नदीवर गेला होता. गिरणाला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचे लक्षात घेऊन हिमेश याने काठालगत दुर्गा मूर्तीचे विसर्जन केले. मात्र, अचानक त्याचा पाय घसरला आणि तो नदीच्या प्रवाहात वाहून गेला. महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. मात्र, सगळीकडे शोध घेतल्यानंतर तो कुठेच आढळला नाही. डोळ्यादेखत हिमेश वाहून गेल्याने त्याची आई आणि बहिणीने आक्रोश केला. घटनेची पोलिसांनी नोंद घेतली आहे. शनिवारी सकाळी पुन्हा हिमेशच्या शोध कार्याला सुरूवात करण्यात आली.

दुसऱ्या घटनेत गाढोदा गावातील गिरणा नदीपात्रात दुर्गा विसर्जनावेळी नववीच्या वर्गातील गणेश उर्फ बाबा भोलेनाथ पाटील (१६) या मुलाचा मृत्यू झाला. गणेश आणि त्याचे काही मित्र नदीपात्रात पोहायला उतरले होते. अर्ध्या तासापर्यंत ते पाण्यात पोहत राहिले. मात्र, अचानक नदीच्या मुख्य धारेत गणेशसह त्याचे दोन मित्र वाहू लागले. गावातील तुकाराम अरुण पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी मारली. त्यांनी अन्य दोन मुलांना तत्काळ बाहेर काढले. काही वेळाने गणेशला नदीतून बाहेर काढून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. गणेशचे वडील भोलेनाथ पाटील हे घटनेच्या वेळी नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरील त्यांच्या शेतात काम करत होते. मुलाचा असा गिरणा नदीत बुडून मृत्यू झाल्याने त्यांनाही मोठा धक्का बसला.

गणेशचा मृतदेह सापडलाच नाही

गणेश गंगाराम कोळी (२७, रा. ममुराबाद, ता. जळगाव) हा त्याचे आई-वडील आणि बहीण यांच्यासोबत पाळधी-तरसोद दरम्यानच्या बाह्यवळण महामार्गावर नव्याने उभारलेल्या गिरणा नदीवरील पुलाखाली घरगुती गणेश विसर्जनासाठी गेला होता. मूर्तीसह नदीत उतरल्यानंतर त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्याला वाचविण्यासाठी कुटुंबियांनी आरडाओरड केली. परंतु, नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने त्यास वाचविण्यात अपयश आले. तेव्हापासून बेपत्ता असलेल्या गणेशचा मृतदेह आजतागायत सापडलेला नाही.