नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वरमधील गोदावरी प्रवाहित राखण्यासाठी आकारास आलेल्या योजनेतून या नगरीची पाण्याची तहान देखील भागविली जाणार आहे. यासाठी सुमारे २९० कोटींची योजना तयार करण्यात आली आहे. गौतमी-गोदावरी धरणातून पाणी उचलून ब्रम्हगिरीलगतच्या अहिल्यासागर बंधाऱ्यात आणले जाईल. या व्यवस्थेतून आठ किलोमीटरच्या क्षेत्रात गोदावरी प्रवाही राखून कुंभमेळ्यात अमृत पर्वणीसह अन्य महत्वाच्या तिथींना स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
गोदावरी नदीच्या स्वच्छतेसह ती कायमस्वरुपी प्रवाही राखण्यासाठी नियोजन करण्याचा आग्रह साधू-महंतांनी धरला आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाने त्र्यंबकेश्वर शहरातून जाणारी गोदावरी प्रवाही राखण्यासाठी योजना तयार केली. त्यामध्ये त्र्यंबकेश्वर नगरपालिकेची पाणी पुरवठा योजनाही समाविष्ट करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गौतमी- गोदावरी (बेजे) हे धरण गोदावरी नदीवर त्र्यंबकेश्वरच्या खालील भागात आहे. तिथून ५०० अश्वशक्तीच्या पाच पंपांच्या मदतीने हे पाणी उचलून जलवाहिनीद्वारे त्र्यंबकेश्वरमधील अहिल्यासागर बंधाऱ्यात नेले जाईल. या बंधाऱ्यातून ते गोदावरी नदीत सोडले जाईल. म्हणजे सोडलेले पाणी पुन्हा आठ किलोमीटरचा प्रवास करून गौतमी- गोदावरी धरणात येईल.
अहिल्यासागर बंधाऱ्यातून सात दिवसांतून एकदा पाणी सोडण्याचे नियोजन आहे. कुंभमेळ्यात पावसाळ्यातील चार महिन्यांत पाणी सोडताना फारसा वहन व्यय होणार नाही. पावसाळा वगळता अन्य महिन्यांत ३८ दिवस पाणी सोडावे लागण्याचा अंदाज आहे. त्यासाठी आवश्यक ते पाणी आरक्षण मंजूर करवून घेतले जाईल. सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. त्या्मुळे याच दिवशी अहिल्यासागरमधून गोदावरी पात्रात पाणी सोडले जाईल. कुंभमेळ्यात पूजा विधी आणि घाटांवर स्नानासाठी याचा उपयोग होणार आहे. कुंभमेळ्यात यंदा तिप्पट गर्दी होण्याचा अंदाज आहे. मोठ्या संख्येने भाविक स्नानासाठी येतील, तेव्हा ही व्यवस्था फायदेशीर ठरेल, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या योजनेतून त्र्यंबकेश्वर शहराची २०५० पर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण होणार आहे.
त्र्यंबकेश्वरची २०११ च्या जनगणनेनुसार १३ हजार ३५३ लोकसंख्या असून तरंगती लोकसंख्या २५ हजार आहे. सध्या त्र्यंबकेश्वरला अहिल्यासागर, अंबोली आणि बेजे या तीन पाणी पुरवठा योजनांमधून पाणी पुरविले जाते. परंतु, फेब्रुवारीनंतर पाण्याचा तुटवडा जाणवू लागतो. उन्हाळ्यात एक-दोन दिवसांआड पाणी पुरवठा करावा लागतो. प्रस्तावित नव्या योजनेतून गोदावरी प्रवाही राहील. शिवाय, त्र्यंबकेश्वर शहराची पुढील ३० वर्षांची पाण्याची गरज पूर्ण होणार आहे. – श्रेया देवचक्के (मुख्याधिकारी, त्र्यंबकेश्वर नगरपालिका)