हेल्मेटअभावी होणारे अपघात, त्यातील प्राणहानी आणि जखमींचे प्रमाण कमी करण्यासाठी शहरात गुरूवारपासून लागू झालेल्या हेल्मेट सक्तीच्या अनुषंगाने पोलिसांनी पुन्हा धडक कारवाईला सुरू केली. यावेळी हेल्मेट परिधान न करणारे काही वाहनधारक पथकाला गुंगारा देत पळून गेले. हेल्मेट नसणारे, एकाच दुचाकीवरुन तिघांचा प्रवास तसेच अन्य नियम धाब्यावर बसविणाऱ्यांचा यात समावेश होता. या कारवाईत शेकडो वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई झाली. यापूर्वीच्या कठोर हेल्मेट सक्तीच्या तुलनेत ही कारवाई सौम्य असल्याची वाहनधारकांची भावना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नाशिक: वापरानुसार दर बदलणार असल्याने मनपावर भार? पाटबंधारेशी पाणी करारनाम्यास ११ वर्षानंतर मुहूर्त

चालू वर्षात शहरात हेल्मेट न वापरल्याने ८३ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला असून २६१ वाहनधारक गंभीररित्या जखमी झाले. डोक्याला मार लागल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याचे अपघाताच्या विश्लेषणात उघड झाले. हे लक्षात घेत शहर पोलिसांनी एक डिसेंबरपासून पुन्हा हेल्मेट सक्ती लागू केली. त्यानुसार स्वामी नारायण चौक, संतोष टी पॉइंट, एबीबी चौक, अशोक स्तंभ, गरवारे पॉइंट, पाथर्डी फाटा, बिटको चौक, बिटको महाविद्यालयासमोर कारवाईचे सत्र राबविले. सकाळपासून सुरू झालेल्या कारवाईने हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनधारकांची धावपळ उडाली. वाहतूक पोलिसांना बघून काहींनी आपले मार्ग बदलून घेतले. काहींनी वाहने भरधाव दामटत पळ काढला. स्वामी नारायण चौफुलीजवळ तीन महाविद्यालयीन युवक विनाहेल्मेट एकाच दुचाकीवरुन निघाले होते. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, संबंधितांनी गुंगारा दिला. अन्यत्रही असे काही प्रकार घडले. क्षमतेहून अधिक जणांना घेऊन दुचाकीस्वार प्रवास करीत असल्याचे दिसून आले.

हेही वाचा- नाशिक: ३५ बालकांपैकी एकही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील नसल्याचे उघड; आधारतीर्थ आश्रम प्रकरण

पोलिसांनी कारवाईसाठी सकाळी १० ते १२ आणि सायंकाळी पाच ते सात अशी वेळ निश्चित केली आहे. या काळात सर्वत्र वाहनधारकांवर कारवाई झाली. हेल्मेट परिधान न केल्यावरून एबीबी चौकात सकाळच्या सत्रात ३६ वाहनधारकांना पकडण्यात आले. हेल्मेट परिधान न केल्याबद्दल प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारला गेला. जे वाहनधारक जागेवर दंड भरण्यास तयार झाले नाहीत, त्यांंच्यावर प्रलंबित प्रकरण म्हणून कारवाई केली गेल्याचे वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सायंकाळी मोहीम सुरू राहिल्याने एकूण कारवाईची आकडेवाडी प्राप्त होण्यास वेळ लागणार आहे. या कारवाईची कालमर्यादा निश्चित असल्याने इतरवेळी वाहनधारक विना हेल्मेट भ्रमंती करताना पहायला मिळाले.

हेही वाचा- नाशिक: भटक्या श्वानांच्या संख्या नियंत्रणावर शंका; शहरात ४५ हजार मोकाट श्वान असल्याचा अंदाज

आधीपेक्षा सौम्य

मागील एक, दीड वर्षात हेल्मेट सक्तीसाठी अवलंबिलेले मार्ग वादाचे विषय ठरले होते. हेल्मेट नसल्यास पंपावर पेट्रोल देण्यास प्रतिबंध, कुणी हेल्मेटधारक दुचाकीला पेट्रोल दिल्यास पंप चालकांवर कारवाई, शासकीय कार्यालये व महाविद्यालयात विना हेल्मेट वाहनधारकास प्रवेश दिल्यास थेट प्रमुखावर कारवाई हे निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यास विरोध होऊनही तत्कालीन पोलीस प्रमुखांनी अंमलबजावणीचा आग्रह धरला होता. या पार्श्वभूमीवर, नव्याने लागू झालेली हेल्मेट सक्ती तितकी कठोर नसल्याचे वाहनधारक सांगतात.

हेही वाचा- नाशिक: शहरात १५ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू

पोलिसांचे आवाहन

हेल्मेट परिधान न करता वाहन चालविल्यास ५०० रुपये दंडाची तरतूद आहे. महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांनी प्रायोगिक तत्वावर गस्त घालणे सुरू केले आहे. त्यामुळे प्राणांतिक अपघातात बऱ्यापैकी घट झाली आहे. अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे सर्व दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against without helmet two wheeler riders in nashik dpj
First published on: 01-12-2022 at 22:09 IST